राज्यातील ८ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदक
मुंबई : वाढती लोकसंख्या, महानगरांची उर्ध्व दिशेने होणारी वाढ तसेच वाढती औद्योगिक क्षेत्रे यामुळे आग आणि इतर आपत्तींना तोंड देणे आव्हानात्मक झाले आहे. रसायनांमुळे उद्भवणाऱ्या आगी, औद्योगिक अपघात, नैसर्गिक संकट तसेच अतिरेकी हल्ल्यांमुळे अग्निशमन दलापुढे नवनवी आव्हाने ठाकत आहेत. या परिस्थितीत अग्निशमन सेवा दलापुढे पायाभूत सेवा-सुविधांचे रक्षण करणे, सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा जपणे आणि औद्योगिक संपदेचे संरक्षण करणे महत्वाची जबाबदारी आली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई येथे केले.
‘राष्ट्रीय अग्निशमन दिन'निमित्त राज्यस्तरीय ‘अग्निशमन सेवा सप्ताह'चा शुभारंभ राज्यपाल राधाकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई अग्निशमन दलातील तसेच राज्याच्या इतर महापालिकांमधील ८ अग्निशमन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.
अग्निशमन कार्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर तसेच ड्रोनचा वापर वाढविण्याबाबत अग्निशमन विभागाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. दलाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निरंतर कौशल्य वर्धन व प्रशिक्षण केले पाहिजे .मुंबईसारख्या महानगरांमध्ये गृहनिर्माण संस्थांना अग्नी सुरक्षेसंबंधी जनजागृती कार्यात सहभागी करून घेतले पाहिजे. तसेच गृहनिर्माण संस्था आणि औद्योगिक आस्थापनांचे नियमित फायर ऑडिट झाले पाहिजे. महत्वाचे म्हणझे अग्निशमन या विषयाचे सर्वंकष अध्ययन करण्यासाठी संशोधन संस्था निर्माण केली पाहिजे. अग्निशमन कार्यात नवनवे तंत्रज्ञान वापरले पाहिजे. तसेच अग्निशमन कार्यासाठी पर्यावरण स्नेही अग्निरोधक विकसित केले पाहिजे, असे राज्यपाल राधाकृष्ण यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी ‘मुंबई अग्निशमन दल'चे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, उपमुख्य अग्निशमन अधिकारी दीपक घोष, सब-ऑफिसर सुनिल गायकवाड, लिडींग फायरमन पराग दळवी, फायरमन तातु परब, पुणे महापालिकेतील फायर इंजिन वाहन चालक करीमखान पठाण, फायर अटेंडन्ट नरसिंहा पटेल, सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिकेतील फायरमन कसप्पा लक्ष्मण माने यांना राष्ट्रपति पदक प्रदान केले.
यावेळी महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांच्या पोशाखाला अग्निशमन ध्वजाचे तिकीट लावले. सदर कार्यक्रमाप्रसंगी मुंबई अग्निशमन दलाचे, औद्योगिक आस्थापनांचे तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अग्निशमन अधिकारी उपस्थित होते.