प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
केडीएमसी उपायुक्त संजय जाधव यांची उचलबांगडी
कल्याण : केडीएमसी'मधील तांत्रिक विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला प्रशासकीय सेवेत अतिरिक्त पदासह उपायुक्त पदाचा पदभार देता येतो, असा राज्य सरकारचा निर्णय आहे. अतिरिक्त पदभार सोपविताना ६ महिन्यापेक्षा जास्त काळ सोपविताना सरकारची परवानगी घ्यावी लागते. असे असताना कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने सरकारकडून कोणतीच परवानगी घेतलेली नसल्याचा गंभीर प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने संजय जाधव यांच्याकडे सोपविण्यात आलेला उपायुक्त पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. उपायुक्त पद काढून घेतल्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी काढले आहेत. संजय जाधव यांची उचलबांगडी करुन त्यांना मूळ तांत्रिक विभागात आणण्यात आले आहे.
‘केडीएमसी'चे अधिकारी संजय जाधव यांचे पद मुख्य उद्यान अधीक्षकाचे आहे. सदरचे तांत्रिक पद असताना त्यांच्याकडे अतिरिक्त पदाचा आणि उपायुक्त पदाचा पदभार देता येत नाही, अशी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे आमदार अनिल परब यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सदरचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यानंतर जाधव यांच्याकडील उपायुक्त पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. जाधव यांना त्यांच्या मूळ पदावर ठेवण्यात आले आहे. तांत्रिक पद असलेल्या अधिकाऱ्यास अतिरिक्त पदभार देता येत नाही, असा राज्य सरकारचा निर्णय आहे.
अतिरिक्त पदभार दिला तरी तो ६ महिन्यापेक्षा जास्त काळ देता येत नाही. त्यानंतर त्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. सरकारकडून ‘केडीएमसी'ने परवानगी घेतलेली नाही. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. यापूर्वी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर बासरे यांनीही प्रशासनाकडे तक्रार करुन पत्रव्यवहार केला होता. त्या पश्चात हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परब यांनी सदरचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर संजय जाधव यांच्याकडील उपायुक्त पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे.
आयुक्त गोयल यांनी जाधव यांच्याकडे असलेले अतिरिक्त पदभार अन्य अधिकाऱ्यांवर सोपविले आहे. त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा पदभार कर विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, माहिती-जनसंपर्क विभागाचा पदभार उपायुक्त वंदना गुळवे, शिक्षण-क्रीडा सांस्कृतिक विभागाचा पदभार उपायुक्त प्रसाद बोरकर आणि समाज विकास विभागाचा पदभार उपायुक्त कांचन गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. इतक्या सगळ्या विभागांचा अतिरिक्त पदभार जाधव यांच्याकडे होता.