नवी मुंबई मनपा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेचा संघटनात्मक मेळावा
नवी मुंबई : आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे वाशी येथे मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते विजय नाहटा, ठाणे लोकसभा उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष सुशील यादव, बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हा प्रमुख सरोज पाटील, शहर प्रमुख विजय माने तसेच ज्येष्ठ नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याच्या सुरुवातीला शहर प्रमुख विजय माने आणि महिला जिल्हा संघटक सरोज पाटील यांनी आपले विचार मांडताना, “खासदार-आमदार निवडणुका झाल्यावर कार्यकर्त्यांना विसरण्याची प्रवृत्ती अनेक नेत्यांमध्ये दिसून येते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मनपा निवडणुकीच्या दृष्टीने खास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा कार्यकर्त्यांचा सन्मान असून त्यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे,” असे मत व्यक्त केले.
बेलापूरचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “२०१४ पासून आपण सोशल मीडियाची ताकद अनुभवली आहे. हे प्रत्येक घटकांशी जोडण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे त्याचा प्रभावी वापर करून लोकांशी नाळ जोडा. तसेच घराघरांत जाऊन शिंदे साहेबांनी केलेल्या कामांची माहिती द्या. मनपा निवडणुकीत महायुतीच्या बळावर उतरण्याचा प्रयत्न आहे; मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील.”
शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “सध्याची प्रभागरचना जवळपास अंतिम असून त्यात किरकोळ बदल होतील. त्यामुळे त्याच अनुषंगाने काम सुरू करा. प्रभागरचना ही केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने त्यात बंधने पाळावीच लागतात.ते पुढे म्हणाले, “नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असल्यानेच काही लोक विविध मार्गाने शिंदे साहेबांवर टीका करत आहेत. तरुण मतदारवर्ग सोशल मीडियाशी जास्त जोडलेला आहे, त्यामुळे निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर अत्यावश्यक आहे. प्रत्येक पॅनेलनुसार जबाबदाऱ्या वाटून घ्या. शिंदे साहेबांनी घेतलेले पुनर्विकासाचे निर्णय आणि वाशी-ऐरोली टोलमाफी जनतेपर्यंत पोहोचवा, विजय आपलाच होईल.”
मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार नरेश म्हस्के म्हणाले, “आपण इथे महायुद्धासाठी जमलो आहोत. ही केवळ मतांची निवडणूक नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सन्मानाची निवडणूक आहे. नवी मुंबई मनावर महायुतीचा भगवा फडकवणे हेच आपले लक्ष्य असले पाहिजे.ते पुढे म्हणाले, विरोधक सकाळपासून शिवसेनेवर टीका करत असतात. त्यांनी तोच वेळ नवी मुंबईच्या विकासासाठी दिला असता तर शहर आज नंदनवन झाले असते. मात्र शिंदे साहेबांनी इतरांप्रमाणे फक्त घराण्याचा विचार न करता संपूर्ण नवी मुंबईच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून लोकांपर्यंत शिंदे साहेबांचे काम पोहोचवावे.