डोंबिवली मध्ये क्रीडा संकुल उभारणी;  १८० कोटी रुपये खर्च

कल्याण :खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला आता लवकरच सुरुवात होत आहे. सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलांची उभारणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने या क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर जात आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. यामध्ये विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. या क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या टप्पा १मधे इंडोर क्रीडासंकुल आणि ऑलिंपिक दर्जाचा तरणतलाव उभारण्यात येणार आहे. तर टप्पा २मध्ये स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांच्या सरावासाठी अत्याधुनिक सुविधांनी आणि साहित्यांनी सुसज्ज असे हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे.

संपूर्ण कामकाज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या निधीतून करण्यात येत असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाची देखभाल आणि व्यवस्थापन कल्याण-डोंबिवली महापालिकाकडे सोपविण्यात येणार आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. याशिवाय एक हजार दोनशे पन्नास चौरस मीटर क्षमतेचा आंतरराष्ट्रीय मानकांचा तरणतलाव, चारशे चौरस मीटर डायव्हिंग पूल आणि प्लॅटफॉर्म तसेच सोळा हजार चौरस मीटर तळघर पार्किंगची सोय निर्माण केली जाणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उल्हासनगर मध्ये ४७ बेवारस वाहनांवर कारवाई