सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या कामांची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
परप्रांतीय रिक्षावाल्यांच्या विरोधात मनसे आक्रमक
कल्याण : मराठी सक्तीच्या विरोधात ४मे रोजी परप्रांतीय रिक्षावाले आंदोलन करणार आहेत. आता हाच मुद्दा तापला असून यात आता मनसेने देखील उडी घेतली आहे. याच रिक्षावाल्यांच्या विरोधात मनसेने कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना पत्र दिले आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, तसेच रिक्षावाल्यांनी गरळ ओकली तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. यावेळी मनसेचे सरचिटणीस प्रकाश भोईर, लोकसभा सचिव राहुल कामात, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील , विधानसभा सचिव अरुण जांभळे, शहर संघटक तकदिर काळण, विधानसभा अध्यक्ष निर्मल निगडे, नगरसेवक गणेश लांडगे, संदेश पाटील, शितल मंढारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मराठी ही राज्याची राजभाषा असून सार्वजनिक सेवा क्षेत्रात तिचा वापर अनिवार्य आहे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक चालकांकडून या नियमांचे उल्लंघन होत असून प्रवाशांशी मराठीत संवाद साधला जात नाही. तसेच वाहनांमध्ये मराठी सूचना दिसून येत नाहीत. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांना येथे निवेदन सादर करण्यात आले असून यात ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये सर्व रिक्षा-टॅक्सी चालकांची मराठी ज्ञान तपासणी, नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, परवाना नूतनीकरणात मराठी अट सक्तीने लागू करणे, वाहनांमध्ये मराठी फलक अनिवार्य करणे, मिटरप्रमाणे रिक्षांसाठी स्वतंत्र लाईन, शेअरिंग रिक्षांसाठी अधिकृत थांबे व स्वतंत्र व्यवस्था, सर्व ठिकाणी एकसंध लाईनप्रणाली, मिटरनुसार प्रवास नाकारणाऱ्यांवर कठोर कारवाई, वारंवार नियमभंग करणाऱ्यांचे परवाने रद्द/निलंबित करणे अश्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
मनसे पदाधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले की, सध्या शहरातील रिक्षा सेवा पूर्णपणे बेशिस्त झाली असून प्रवाशांना मनमानी भाडे, प्रवास नकार आणि नियमांचे उल्लंघन यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने ही परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष देऊन आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, याची नोंद घ्यावी.
- आमदार, प्रमोद पाटील