माझा शुभम आता कधीही हातांनी काही करु शकणार नाही
पनवेल : आई बाबा, मी मोठा होऊन तुमचे नाव उज्ज्वल करेन, अशी स्वप्ने पाहणारा १७ वर्षीय शुभम कुंडलिक आंधळे आज मृत्युसारखे जीवन जगतोय. पनवेल तालुक्यातील चिखले गावात मंडप लावण्याच्या कामावर असताना झालेल्या भयानक अपघातामुळे त्याला आपले दोन्ही हात गमवावे लागले आहेत. तसेच पाय गंभीररित्या भाजले गेले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून तो कोमामध्ये आहे.
शुभम रिक्षा चालक कुंडलिक आंधळे यांचा मुलगा. मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पार्थर्डी तालुक्यातील वंजारवाडी येथील आंधळे कुटुंब रोजगाराच्या निमित्ताने काही वर्षापूर्वी पनवेल तालुक्यातील नेरे येथील विहीघर येथे स्थायिक झाले. कुंडलिक आंधळे रिक्षा चालवून आपले कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असून ते दोन्ही मुलांचे शिक्षण सुध्दा करत होते. शुभम आंधळे यांचा लहान मुलगा, मार्च महिन्यात त्याने बारावीची परीक्षा दिली होती. बारावीत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण घेण्याबरोबरच तो भविष्यासाठी नवे ध्येय बाळगून होता. पण, नशिबाने त्याच आयुष्य एका क्षणात उध्वस्त केले.
१ मे २०२५ रोजी मंडप डेकोरेटर पंकज फडके याने शुभमला मंडप उभारण्यासाठी चिखले गाव येथे नेले होते. शिडीवर चढून मंडपाचे काम करत असताना शुभमचा हात वरुन गेलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीला लागला आणि त्याला विजेचा जबर धक्का बसला. क्षणातच तो शिडीवरुन खाली कोसळला. सदर अपघात इतका भीषण होता की, शुभमचे दोन्ही हात कोपरापासून तोडावे लागले, त्याचे पायही गंभीररित्या भाजले.
या घटनेनंतर शुभमला एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून तो कोमामध्ये आहे. घरची परिस्थिती बिकट असून त्याच्या उपचारावर आतापर्यंत ८.७२ लाख रुपये खर्च झाला आहे. पुढे उपचारासाठी आणखी १०-१२लाख रुपयांची गरज आहे. पण, रिक्षा चालवून इतका मोठा खर्च कसा उचलणार? असा प्रश्न वडील कुंडलिक आंधळे त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
माझ लेकरु डोळ्यांसमोर तडफडत आहे, त्याचे हात गेलेत, बोलताही येत नाही. पण, तरीही तो जगावा, अशीच देवाकडे प्रार्थना आहे. सरकारनं तरी आम्हाला आधार द्यावा, अशी आर्त हाक वडील कुंडलिक देत आहेत. या घटनेत शुभम कायमस्वरुपी अपंग झाल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या कुटुंबाला मुलाच्या उपचारासाठी प्रचंड खर्चाचा बोजा पेलावा लागत आहे.
मंडप डेकोरेटरचा निष्काळजीपणा घटनेला कारणीभूत...
मंडप डेकोरेटर पंकज फडके याने सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करता शुभमला मंडप उभारण्यासाठी धोकादायकरित्या काम करण्यास भाग पाडले. त्यामुळेच सदरचा अपघात घडल्याचा आरोप कुंडलिक आंधळे यांनी केला आहे. अपघातानंतर पंकज फडके याने शुभमच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचे आश्वासन देऊन आंधळे यांच्याकडून एका कागदावर सही करुन घेतली होती. मात्र, आतापर्यंत त्याने फक्त ६० हजार रुपयांची मदत केली आहे. त्यानंतर फडके याने या अपघाताशी आमचा काहीही संबंध नाही, आमच्याकडे राजकीय पाठबळ आहे, तुला जे करायचे ते कर अशी धमकी दिल्याचा आरोप आंधळे यांनी केला आहे.
मंडप डेकोरेटरवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल...
सदर घटना अल्पवयीन मुलांना कोणतीही सुरक्षा न देता धोकादायक कामावर लावल्याचे गंभीर वास्तव अधोरेखित करते. तसेच अशा अपघातांना आळा बसावा यासाठी कामगार आणि सुरक्षेच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी होणे किती आवश्यक आहे, ते देखील स्पष्ट होते. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी सदर घटनेची गंभीर दखल घेऊन मंडप डेकोरेटर पंकज ज्ञानेश्वर फडके याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्यावर पुढील कारवाई सुरु केली आहे.