अवजड वाहनांच्या वाहतूक नियंत्रणासाठी हाईट बॅरियर्स बसवा

भिवंडीः तालुक्यातील मौजे लामज येथील अंतर्गत रस्त्यावर जड-अवजड वाहने मोठ्या प्रमाणात धावत असल्याने रस्त्याची दयनीय दुरवस्था होत असून नागरिकांना धुळीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अशा वाहनांच्या वाहतूक नियंत्रणाकरिता ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने ठराव करण्यात आला आहे. या लामज रस्त्यावर उंचीचे अडथळे (हाईट बॅरियर्स) बसवण्यासाठी तहसीलदार प्रशासनाने यासाठी परवानगी देण्यासह ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'ला तसे तात्काळ निर्देश द्यावे, अशी मागणी लामज ग्रामपंचायत प्रशासनाने तहसीलदार कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

त्यानुषंगाने लामज गावच्या हद्दीतून शेजारील गावातील खदानी आणि क्रेशरची अवजड वाहने (डंपर, हायवा) सातत्याने आणि अनियंत्रितपणे धावत आहेत. परंतु, प्रामुख्याने लामज रस्ता ग्रामीण वाहतुकीसाठी असून त्याची भारक्षमता मर्यादित आहे. दरम्यान, लामज पुनर्वसित गाव असून जड-अवजड वाहनांसाठी मुख्य रस्ता अनगाव मार्गे असल्याची माहिती लामज गावातील सूत्रांनी दिली आहे. जड-अवजड वाहने लामज गावातून जात असल्याने रस्त्याची दुर्दशा होत असल्याचा आरोपही येथील ग्रामस्थांनी केला आहे.

अतिभार वाहनांमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून संपूर्ण रस्ता नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांना चालणेही कठीण झाले आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनासुध्दा सदर रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याबाबत येथील शाळेकडूनही पत्र प्राप्त झाले असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जड-अवजड वाहनांमधून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पिकांचेही नुकसान होत आहे. याकरिता ५ फेब्रुवारी रोजीच्या ग्रामसभेत अशा जड-अवजड वाहनांच्या वाहतूक नियंत्रित करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४५ आणि ५३ नुसार सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ११५ आणि ११६ मधील तरतुदींनुसार तहसीलदार कार्यालयास सार्वजनिक सुरक्षिततेसाठी विशिष्ट रस्त्यावरील वाहतूक मर्यादित करण्याचे पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे ग्रामसभेच्या मागणीनुसार लामज रस्त्यावर केवळ हलकी वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील गाड्या जातील एवढ्याच उंचीचे लोखंडी हाइट बॅरियर्स बसवण्यास प्रशासकीय मंजुरी मिळावी आणि संबंधित विभागाला त्याबाबत तातडीने निर्देश द्यावेत, अशी विनंती सदर निवेदनातून करण्यात आली आहे. गावाच्या सार्वजनिक हितासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदारांनी सकारात्मक विचार करुन त्वरित कार्यवाही करण्याचेही निवेदनात नमूद केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ई-गव्हर्नन्स क्षेत्रात नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम