‘अंबरनाथ'मध्ये सत्तासंघर्षाचा क्लायमॅक्स

अंबरनाथ : ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या राजकीय पटलावर सध्या कमालीची अनिश्चितता निर्माण झाली असून सत्तेच्या समीकरणांनी अनपेक्षित वळण घ्ोतले आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी (अजित पवार गट) जवळीक साधून ‘अंबरनाथ विकास आघाडी' स्थापन करणाऱ्या ‘काँग्रेस'च्या १२ नगरसेवकांवर पक्षाने निलंबनाची कुऱ्हाड चालवल्यानंतर, यातील १० नगरसेवकांनी नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ‘भाजपा'मध्ये अधिकृत प्रवेश केला. मात्र, या बंडातील प्रमुख शिलेदार कबीर गायकवाड आणि किरण राठोड यांनी आपण ‘भाजपा'मध्ये सामील न होता केवळ ‘आघाडी'ला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

या अंतर्गत फुटीमुळे आणि निलंबनाच्या कारवाईमुळे नगरपरिषद मधील सत्तास्थापनेचा तांत्रिक पेच अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. ‘काँग्रेस'च्या निलंबनामुळे सदर १२ नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या ‘अपक्ष' ठरले असून, त्यांनी ‘काँग्रेस'च्या अधिकृत पत्रावर यापूर्वी स्थापन केलेली ‘अंबरनाथ विकास आघाडी' आणि अभिजीत करंजुले यांची गटनेतेपदी केलेली निवड आता अवैध ठरली आहे. नियमानुसार, २ तारखेची डेडलाईन संपल्याने आता नवीन एकत्रित गट स्थापन करण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपली स्वतंत्र गटनोंदणी करणे अनिवार्य झाले आहे. नेमक्या याच तांत्रिक खिंडीचा फायदा उठवण्यासाठी ‘शिवसेना'ने आता आक्रमक मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

सध्याच्या गणितानुसार, थेट जनतेतून निवडून आलेल्या ‘भाजपा'च्या नगराध्यक्षांकडे स्वतःचे १५, ‘राष्ट्रवादी'चे ४, ‘भाजपा'वासी झालेले १० आणि ‘आघाडी'ला पाठिंबा देणारे २ असे एकूण ३१ जणांचे संख्याबळ दिसत आहे. असे असले तरी तांत्रिकदृष्ट्या सदर नगरसेवक कोणत्याही एका छत्राखाली नाहीत. दुसरीकडे २७ नगरसेवक आणि एका अपक्षासह २८ चे भक्कम संख्याबळ असलेल्या ‘शिवसेना'ला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी केवळ २ नगरसेवकांची गरज आहे. निलंबित नगरसेवकांवर सध्या पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत नसल्याने, ‘शिवसेना'ने ‘भाजपा'च्या गोटात गेलेल्या २ ते ३ नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी ‘मास्टरस्ट्रोक' खेळण्याची तयारी केली आहे.

अंबरनाथच्या या ‘पॉवर गेम'मध्ये ‘शिवसेना'चा सदर प्रयत्न यशस्वी ठरल्यास ‘भाजपा'ला सत्तेपासून दूर रहावे लागण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत ‘राष्ट्रवादी'चे ४ नगरसेवक ‘भाजपा'ची साथ निभावणार की शिवसेना त्यांनाही आपल्या जाळ्यात ओढून सत्तेची नवी समीकरणे मांडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत होणारी गटांची अधिकृत नोंदणीच अंबरनाथच्या सत्तेचा खरा ‘किंग' कोण? याचा फैसला करणार आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘नवी मुंबई भाजपा'चा विकासाचा जाहीरनामा प्रसिध्द