प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
विद्यार्थी करणार पालकांच्या ड्रायव्हींगचे मूल्यमापन
नवी मुंबई : रस्त्यावर वाहने चालवताना वाहतूक पोलिसांचा डोळा चुकवून नियम मोडणाऱ्या पालकांसाठी आता धोक्याची घंटा वाजणार आहे. पोलिसांचा दंड कदाचित पालक भरतील, पण स्वतःच्या मुलांनी दिलेला लाल शेरा कसा पुसणार? नवी मुंबई पोलीस आयुवतालयाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत ‘आई-बाबांचे प्रगतीपुस्तक' असा अत्यंत कल्पक आणि प्रभावी उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून आता घरातील चिमुरडेच छोटा पोलीस बनून आपल्या पालकांच्या वाहतूक शिस्तीचे मूल्यमापन करणार आहेत.
मुलांनी सांगितलेले पालकांना लवकर समजते, ते ओळखून नवी मुंबई पोलिसांनी रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक रोखण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी छोटा पोलीस आणि आई-बाबांचे प्रगतीपुस्तक यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून नवी मुंबईकरांना वाहतुकीचे धडे दिले जात आहेत. २ फेब्रुवारी रोजी वाशी येथे पार पडलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान'च्या समारोप कार्यक्रमात सदर निर्धार व्यक्त करण्यात आला.
विद्यार्थी होणार छोटा पोलीस...
विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी, उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना छोटा पोलीस अशी ओळख दिली जाणार आहे. शाळेत मुलांच्या प्रगतीचे पुस्तक जसे शिक्षक भरतात, त्याच धर्तीवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून वाहतूक प्रगतीपुस्तक (ट्रॅफिक रिपोर्ट कार्ड) तयार करण्यात आले आहे. यामध्ये वाहतुकीच्या विविध नियमांची यादी देण्यात आली आहे. नवी मुंबईतील शाळा-महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर प्रगतीपुस्तक दिले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी छोटा पोलीस बनून आपल्या पालकांच्या ड्रायव्हिंंगचे बारकाईने निरीक्षण करणार आहेत. तसेच आपल्या प्रगतीपुस्तकामध्ये लाल किंवा हिरवा शेरा देऊन पालकांचे मूल्यमापन करणार आहेत.
आई-बाबा दुचाकी चालवताना हेल्मेट घालतात का? लाल सिग्नलचे पालन करतात का? सिटबेल्टचा वापर करतात का? वाहन चालवताना मोबाईलचा वापर होतो का? यासह ९ निकषांचे मुले मूल्यमापन करणार आहेत. त्यानंतर नियमांचे पालन केल्यास बॉक्समध्ये हिरवा तर पालन न केल्यास लाल शेरा देऊन आपल्या आई-वडिलांचे वाहतूक शिस्तीचे प्रगतीपुस्तक भरणार आहेत. सदर रिपोर्ट कार्ड एका ठराविक कालावधीसाठी असणार आहे. कालावधी संपल्यानंतर मुलांनी दिलेले रिपोर्ट कार्ड शाळेमार्फत पोलिसांकडे जमा केले जाणार आहे किंवा शाळेत प्रदर्शित केले जाणार आहे. जर एखाद्या पालकाला आपल्या मुलाकडून लाल शेरा मिळाला, तर ती बाब कोणत्याही दंडापेक्षा जास्त प्रभावी ठरेल, असा पोलिसांचा विश्वास आहे.
‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून छोटा पोलीस आणि आई-बाबांचे प्रगतीपुस्तक असा उपक्रम राबवला जात आहे. सह-पोलीस आयुक्त संजय येनपुरे आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या टीमने या उपक्रमाचे नियोजन केले आहे. या उपक्रमामुळे केवळ पालकांमध्येच नाही, तर भविष्यातील वाहनचालक असलेल्या मुलांमध्येही रस्ता सुरक्षेचे संस्कार आतापासूनच रुजले जातील, असा विश्वास पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केला आहे. तसेच आई-बाबांचे प्रगतीपुस्तक उपक्रम लवकरच शहरातील सर्व नामांकित शाळांमध्ये राबण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.