उद्यानाला तलावाचे स्वरुप; चिमुरड्यांच्या आनंदावर विरंजण
खारघर : अवकाळी पावसामुळे तळोजा सेक्टर-९ आणि सेक्टर-१४ मधील उद्यानाला तलावाचे स्वरुप आले आहे. उद्यानातील खेळण्यांभोवती मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे मुले-मुलींना खेळापासून दूर रहावे लागत आहे.
तळोजा फेज-१ वसाहतीत काही सेक्टर मध्ये उद्यान आणि मैदान आहे. परंतु, सिडको आणि पनवेल महापालिका प्रशासनाने उद्यान आणि मैदान विकसि्त केली नसल्याने या उद्यान आणि मैदानांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान, पनवेल महापालिकेने काही दिवसापूर्वी तळोजा सेक्टर-९ मधील प्लॉट क्रमांक-६ आणि सेक्टर-१४ मधील प्लॉट क्रमांक-९२ मधील उद्यान विकसित करुन पथदिवे, मुले-मुलींसाठी खेळणी, कसरत करण्यासाठी जिम आणि उद्यानात हिरवळ तयार करणे आदी कामासाठी एजन्सीची नेमणूक केल्यामुळे एजन्सी कडून उद्यानातील मोडकळीस आलेल्या खेळणींची दुरुस्ती करुन काही खेळणी नव्याने बसविली आहेत. त्यात शाळेला सुट्टी पडल्यामुळे उद्यानात सकाळ-संध्याकाळी पालकांसह बच्चे कंपनीची गर्दी असते. मात्र, उद्यानात खेळणी बसविण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या साचणारे पाणी निचरा करण्यासाठी पनवेल महापालिकेने कोणत्याही प्रकारची उपाय योजना केली नसल्याने उद्यानाला तलावाचे स्वरुप आले आहे.
दरम्यान, खारघर मधील काही उद्यानातील खेळणींच्या सभोवती तुंबलेले पाणी निचरा होण्यास आणि सदर परिसर सुकण्यासाठी ४ ते ५ दिवस लागणार असल्याने लहान मुले-मुलींना खेळापासून वंचित राहावे लागणार असल्यामुळे बच्चे कंपनी मध्ये नाराजी पसरली आहे.