नेपच्युन गृहसंकुलातील पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गस्थ

कल्याण : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आंबिवली परिसरात असलेल्या नेपच्युन गृहसंकुलातील पाण्याची समस्या आता कायमस्वरुपी मार्गी लागली आहे. ‘कल्याण पश्चिम'चे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे केलेल्या अविरत पाठपुराव्याला यश आले असून या जलवाहिनीच्या कामाचे नरेंद्र पवार यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले.

कल्याणच्या आंबिवली जवळील नेपच्युन स्वराज्य नगरी येथील शेकडो रहिवासी गेल्या वर्ष दिड वर्षांपासून पाण्याच्या मोठ्या समस्येला तोंड देत आहेत. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या गृहसंकालातील अनेक जणांनी इथले घर सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला, तर काही जण आपले स्वतःचे राहते घर भाड्याने देऊन दुसरीकडे भाड्याच्या घरामध्ये रहायला गेले होते. या परिस्थितीवरुनच येथील पाणी समस्येचा अंदाज येऊ शकतो.  

या पार्श्वभूमीवर नेपच्युन गृहसंकुलातील महिला भगिनींनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या कानावर सदर समस्या घालत ती सोडवण्यासाठी मागणी केली होती. तसेच स्थानिक रहिवासी अनंता पाटील आणि दशरथ पाटील यांनीही सदर काम होण्यासाठी नरेंद्र पवार यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार नरेंद्र पवार यांनीही लगेचच कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे पत्रव्यवहार करुन सदर पाणी समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. गेले वर्ष दिड वर्षे नरेंद्र पवार यांच्याकडून ‘केडीएमसी'कडे अखंड आणि अविरत पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून ‘केडीएमसी'ने या गृहसंकुलासाठी स्वतंत्र नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून नेपच्युन स्वराज नगरी मेन गेट ते स्वराज्य नगरी सेक्टर-२ पर्यंत सदर नवीन जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.

त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेचे औचित्य साधून या जलवाहिनीच्या कामाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते भूमीपुजन करण्यात आले. त्यामुळे लवकरच सदर काम पूर्णत्वास जाणार असून पुरेशा पाण्याअभावी येथील रहिवाशांनी भोगलेल्या यातनांमधून आता त्यांची कायमस्वरुपी सुटका होणार आहे.

त्यावर सदर कामाचे श्रेय केवळ आपल्या एकट्याचे नसून यामध्ये गृहसंकुलातील महिला भगिनींचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्याकडून सतत आपल्याला या कामासाठी आग्रह आणि विनंती केली जात होती. मात्र, या कामाच्या श्रेयापेक्षा माय भगिनी आणि सर्व रहिवाशांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद हीच आपल्यासाठी समाधानाची मोठी पोचपावती असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.

या प्रसंगी भाजपा मांडा टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, बुधाराम सरनोबत, मोहने मंडल सरचिटणीस अनंता पाटील, दशरथ पाटील, परेश गुजरे, संदीप पाटील, शशिकांत पाटील, अक्षय पाटील, भरत कडाळी, दिपक कांबळे, हेमंत गायकवाड, संदीप गायकवाड, अमोल केदार, शैलेश देशपांडे, रामजीत तिवारी, पंकज सिंह, पुनित सिंह, अर्चना पाटील, कावेरी पाटील, प्रतिक्षा बारलो, सेक्टर-२ फेडरेशन अध्यक्ष सोमनाथ चकोर, भानुदास थोपटे, बाळा कविटकर, शिल्पा थोपटे, सारिका बोराडे, आशा खरात, शितल चकोर, आदिंसह सोसायटीमधील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

माथाडी चळवळ थांबविणे अशक्य -मुख्यमंत्री