टिटवाळा मधील नागरी समस्यांबाबत ‘शिवसेना'चे आयुक्तांना साकडे
कल्याण : मांडा टिटवाळा परिसरातील नागरी समस्यांबाबत ‘शिवसेना शिंदे गट'चे उपशहरप्रमुख विजय देशेकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांना भेटून निवेदन दिले. तसेच सदर समस्यांबाबत चर्चा केली.
त्यात प्रामुख्याने कचरा व्यवस्थापन सुविधा अंतर्गत मांडा टिटवाळा परिसरात एलआरसी ज्या मोठ्या गाड्या आहेत, त्यांची कमतरता आहे. पिण्याच्या पाण्यासंदर्भात लोकवस्ती वाढत असल्याने पुढे भविष्यात तुटवडा होऊ नये म्हणून काळू नदीवरील केटी बंधारा वाढवणे. जे जलकुंभ दुरुस्ती अथवा बंद आहेत ते सुरू करावेत. अमृत योजना अंतर्गत मांडा पश्चिम येथील रेल्वे लाईन क्रॉस करुन पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा. आरोग्य विभाग पूर्णतः मांडा टिटवाळा परिसरात दुर्लक्ष होत आहे, असे देशेकर यांनी आयुक्त गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या संकल्पनेतील दवाखाना जो टिटवाळा जकात नाका येथे तयार स्थितीत असून तो त्वरित सुरू करावा. रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांना मालमत्तेचा जलदगतीने ताबा द्यावा आणि ज्यांना ताबा दिलेला आहे, त्यांच्या मालमत्तेचा दुरुस्ती करुन द्यावी.
टिटवाळा स्टेशन ते स्वामी विवेकानंद चौक निमकर नाका येथे अनधिकृत फेरीवाल्यांनी फुटपाथ व्यापलेला आहे तो मोकळा करून द्यावा. दळणवळण परिवहन सेवा ही सुरळीत करावी टिटवाळा कल्याण रिंग रोडचे काम लवकर पूर्ण करुन सदर रस्ता सुरु करावा. महापालिकेत तब्बल १५ ते २० वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे करोडो रुपये खर्च करुन देखील व्यवस्थित विकास कामे दिसत नाही. परिणामी, नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या कामांचे लेखापरीक्षण व्हावे, अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली.
गणेशोत्सव काळात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची देखील योग्य ती तपासणी करावी. यासह इतर सर्व समस्यांबाबत शिष्टमंडळाने लेखी निवेदन देऊन पाहणी दौरा आयोजित करण्याची विनंती आयुवत गोयल यांना केली. त्यावर आयुक्तांनी सकारात्मक उत्तर दिले. याप्रसंगी माजी नगरसेवक जयवंत भोईर, सामाजिक कार्यकर्ते संदीप मिश्रा, उपशहरसंघटक महिला सुषमा शर्मा, शाखाप्रमुख अशोक चौरे, ज्ञानेश्वर मढवी, शिवसैनिक नरेंद्र पाटील, महिला उपशाखा संघटक श्रेया जाधव, गटप्रमुख सुशील जाधव, अभि नरके पाटील, आदि उपस्थित होते.