अंबरनाथ पालिकेचे मालमत्ता कर वसुलीत कोटीच्या कोटी उड्डाणे

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर, मालमत्ता कर वसुलीला गती देण्यासाठी राबविण्यात आलेला ‘गृहसंकुल कर वसुली शिबिर' उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून मालमत्ता करवसुलीतून कोटिच्या कोटी उड्डाणे घेण्यात आली आहेत. शहरातील विविध गृहसंकुलांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेतून गेल्या महिनाभरात पालिकेच्या तिजोरीत सुमारे दोन कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या विस्तारित क्षेत्रात गेल्या काही वर्षांत गृहसंकुले, गृहप्रकल्प आणि औद्योगिक वसाहतींचे जाळे वेगाने पसरत आहे. या वाढत्या नागरीकरणामुळे मालमत्ता कराच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली असून, थकीत कर वसुलीसाठी पालिकेकडून सातत्याने नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून, शासनाच्या धोरणानुसार थकीत मालमत्ता करावरील दंडात्मक रकमेत ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही प्रशासनाने घेतला आहे, ज्याचा लाभ अनेक करदात्यांनी घेतला.

नागरिकांचा वेळ आणि त्रास वाचवण्यासाठी पालिकेच्या कर विभागाने गेल्या महिनाभरात शहरातील ४४ विविध गृहसंकुलांमध्ये शनिवार आणि रविवारी विशेष शिबिरांचे नियोजन केले होते. या मोहिमेला रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, केवळ कर भरणाच नव्हे तर कर विभागाशी संबंधित प्रलंबित कागदोपत्री कामेही याठिकाणी तत्काळ मार्गी लावण्यात आली. सध्या अंबरनाथ पालिकेच्या दप्तरी १ लाख ३२ हजार ६६० मालमत्तांची नोंद असून, चालू आर्थिक वर्षात ५,२०० नवीन मालमत्तांची भर पडली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी अशा प्रकारची शिबिरे भविष्यातही आयोजित केली जातील, अशी माहिती कर निरीक्षक तेजस राणे आणि नरेंद्र संखे यांनी दिली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

युरो स्कुलची नियमबाह्य फी वाढ; पालक आक्रमक