वाशी पोलिसांची सतर्कता; टळली १५ लाखांची संभाव्य सायबर फसवणूक

नवी मुंबई : ॲमेझॉन डिलिव्हरीच्या नावाखाली वाशीतील दाम्पत्याकडून तब्बल १५ लाख रुपये लुबाडण्याचा प्रयत्न सायबर चोरटद्दांनी केला होता. मात्र, वाशी पोलिसांनी आपल्या तांत्रिक कौशल्याने सायबर चोरट्यांचा सदर प्रयत्न उधळून लावला आहे. कोणतीही आर्थिक हानी होऊ न देता वाशी पोलिसांना तक्रारदारांचे पैसे सुरक्षित ठेवण्यात यश आल्याने वाशी पोलिसांच्या सायबर पथकाचे कौतुक होत आहे.  

३१ जानेवारी रोजी सकाळी वाशीत राहणाऱ्या निशा सुवर्णा यांच्या बँक खात्यातून १५ लाख रुपये वजा झाल्याबाबतचा मेसेज त्यांना प्राप्त झाला होता. त्यामुळे निशा सुवर्णा या पती रवी सुवर्णा यांच्यासह घाबरलेल्या अवस्थेत वाशी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानंतर वाशी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत निशा सुवर्णा यांना ॲमेझॉन डिलिव्हरीच्या संदर्भात एका अनोळखी व्यक्तीने कॉल केला होता. सदर अनोळखी व्यक्तीने त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या मोबाईलवर एक एपीके फाईल इन्स्टॉल करायला लावून त्यांच्या मोबाईलची क्रीन शेअर करण्यास प्रवृत्त केले होते.  

तसेच सायबर चोरट्यांनी सुवर्णा यांच्या खात्यातून पैसे काढून घेण्यासाठी त्यांना एक भ्रामक मेसेज पाठवून यांना घाबरवले होते. प्रत्यक्षात त्यांच्या खात्यातून पैसे वजा झाले नव्हते. मात्र, सदर मेसेज पाहून निशा सुवर्णा यांनी बॅलन्स चेक करण्यासाठी युपीआय पिन टाकला असता, तर क्रीन शेअरिंगमुळे तो चोरला गेला असता आणि खरोखरच त्यांच्या खात्यातून १५ लाख रुपये लंपास झाले असते.

वाशी पोलीस ठाण्यातील सायबर अंमलदार वाघमारे यांनी तत्काळ तांत्रिक तपासणी करत एचडीएफसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँकेशी संपर्क साधून खात्री केली असता सुवर्णा यांच्या खात्यातून एकही रुपया वजा झाला नसल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सुवर्णा यांच्या मोबाईल मधील संशयित एपीके ॲप्लिकेशन काढून टाकले.  

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाने केलेल्या या त्वरित हस्तक्षेपामुळे सुवर्णा दाम्पत्याची मोठी फसवणूक टळली आहे. सुवर्णा दाम्पत्याने पोलिसांच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.  

वाशी पोलिसांचे नागरिकांना आवाहन...
डिलिव्हरी किंवा केवायसीच्या नावाखाली येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करु नका. प्ले स्टोअर व्यतिरिक्त अन्य कुठूनही ॲपस (एपीके) डाऊनलोड करु नका. एनीडीस्क किंवा टीमव्हीवर सारखे क्रीन शेअरिंग ॲप्स अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरुन डाऊनलोड करु नका. तसेच बँक खात्यातून पैसे कट झाल्याचा मेसेज आल्यास घाबरुन न जाता अधिकृत बँक स्टेटमेंट तपासा किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन वाशी पोलिसांनी नागरिकांना केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वायू, ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांचे उल्लंघन