प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
वायू प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजनांकडे दुर्लक्ष
नवी मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने वायू, ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना न राबविणाबद्दल नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत ७ बांधकामांवर काम बंदची धडक कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करुन घेललेल्या जनहित याचिका क.३/२०२३ मध्ये, २४ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार शहरातील वाढत्या वायू प्रदुषणावर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये बांधकामाच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषण, वायू प्रदुषण आणि ब्लास्टिंग करिता अवलंबवायची मानक कार्यप्रणाली आणि बांधकाम प्रकल्पांच्या साईटवर होणाऱ्या वायू आणि ध्वनी प्रदुषणावर दंडात्मक कारवाईबाबतची नियमावली मानक कार्यप्रणाली अन्वये दंडात्मक शुल्क भरणा करणेबाबत संबंधित विकासक-बांधकाम धारकांना कळविण्यात आलेले होते.
तसेच ध्वनी, वायू प्रदुषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्याबाबत खातरजमा करुनच काम करण्यात यावे. बांधकाम स्थळच्या सभोवताली ५०० मीटर पर्यंतच्या परिसरात आणि रस्त्यांवर धूळ प्रदुषण होऊ नये याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी; अन्यथा सुरु असलेले बांधकाम त्वरित बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीसा ‘नमुंमपा'च्या वतीणे संबंधित विकासक, बांधकाम धारक यांना बजाविण्यात आलेल्या आहेत.
तथापि, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी २४ जानेवारी २०२६ रोजी सुरु असलेल्या बांधकाम, विकास कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता सदर पाहणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यात बांधकाम प्रकल्पाच्या परिघाभोवती किमान ३० फुट उंच टिन धातूचे पत्रे लावणे आवश्यक असताना प्रकल्पावर त्यापेक्षा कमी उंचीचे टिन धातुचे पत्रे आढळून आले. बांधकाम सुरु असलेल्या इमारतींना सर्व बाजुने हिरव्या कापडाच्या ओल्या ज्यूट शीटच्या ताडपत्रीने बंद केलेले आढळून आलेले नाही. बांधकामाच्या ठिकाणी साहित्य लोडींग आणि अनलोडींग करताना वॉटर फॉगींग केले जात नाही. बांधकाम मजुरांनी मास्क, गॉगल्स, ॲप्रॉन, आदि परिधान केलेले दिसले नाही. बांधकाम स्थळाच्या सभोवतालच्या ५०० मीटर पर्यंतच्या परिसरात आणि रत्यांवर धूळ प्रदुषण होऊ नये याकरिता पाणी फवारणी यंत्र कार्यान्वित नव्हते. घनमाती, बांधकाम साहित्य आदिंची वाहतूक करताना ते हिरव्या कपड्याने झाकलेले आढळून आले नाही. पाहणीवेळी बांधकाम स्थळाच्या ठिकाणी कोणीही जबाबदार प्रतिनिधी, व्यवस्थापक उपस्थित नव्हते.
त्यामुळे २७ जानेवारी रोजी मे. साई अमृत बिल्डर्स, सेक्टर-२०, सानपाडा, मे. मेट्रीक्स बिल्डर्स, सेक्टर-१९, सानपाडा, मे. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपर्स, सेक्टर-२०, सानपाडा, मे. कामधेनु ग्रीन, सेक्टर-१९, सानपाडा, मे. रॉयल पाम डेव्हलपर्स (डीपीव्हीजी वेंचर्स एलएलपी) सेक्टर-२०, सानपाडा, तसेच मे. कामधेनु लाईफ स्पेस, सेक्टर-८, सानपाडा आणि मे. सत्यम लाईफ स्पेस, सेक्टर-१६ए, सानपाडा या ७ बांधकाम साईटस् सीलबंद करण्यात आलेल्या आहेत.
सदर मोहिम महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या आदेशान्वये, अति. आयुक्त डॉ. राहुल गेठे आणि अतिक्रमण उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली, तुर्भे विभागातील स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे आणि इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये राबविण्यात आली.