पनवेल मधील स्वप्नालय बालगृहातून पाच मुलींचे पलायन;
पनवेल : पनवेल येथील स्वफ्नालय या मुलींच्या बालगृहातून 12 ते 17 वयोगटातील पाच मुलींनी पलायन केल्याची घटना गत रविवारी घडली. मात्र पोलिसांनी केलेल्या शोधकार्यामुळे यातील 4 मुली पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. पोलिसांनी आता पळून गेलेल्या पाचव्या मुलीचा शोध सुरु केला आहे. या बालगृहात मुलींना मनाप्रमाणे राहायला मिळत नसल्याने त्या बालगृहातून पळून गेल्याचे त्यांच्या चौकशीत आढळुन आले आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वफ्नालय हे मुलींचे बालगृह असून या बालगृहामध्ये विविध गुह्यातील अल्पवयीन मुली, वेगवेगळ्या कारवायांमधुन सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींना शिक्षा म्हणून नव्हेतर पुनर्वसनाच्या हेतूने ठेवण्यात येते. सध्या या बालगृहात 39 मुली असून यापैकीच 12 ते 17 वयोगटातील पाच मुलींनी रविवारी 28 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बालगृहातील खिडकीची ग्रील तोडून पलायन केले होते. यातील एक मुलगी उरण येथील एका प्रकरणातील पिडीत आहे. तर इतर चार मुली या तळोजा, पनवेल व कर्जत येथील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत.
या पाच मुली पळाल्याची बाब सकाळी उघडकीस आल्यानंतर बालगृहाच्या केअरटेकर कविता पंडीत यांनी तात्काळ याबाबतची माहिती स्वफ्नालय बालगृहाच्या अधिक्षक, बालकल्याण समितीचे पदाधिकारी तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष अधिकारी यांना फोनवरुन दिली. त्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या या मुलींचा शोध सुरु केला. तसेच पळुन गेलेल्या मुली कुठे जाऊ शकतात, त्यांचे मूळ गाव कोणते याची माहिती पोलिसांनी बालगृहाच्या केअरटेकर कडून घेतली.
तसेच मुंबई व उपनगरातील रेल्वे पोलिसांसोबत समन्वय साधून या मुलींबाबत त्यांना माहिती कळवण्यात आली. त्याचप्रमाणे बालगृहातुन पळून गेलेल्या मुलींच्या नातेवाईकांकडे देखील चौकशी सुरु करण्यात आली. पोलिसांनी इतर तपास यंत्रणांसोबत केलेल्या समन्वयामुळे चार मुली सुखरुप पोलिसांना सापडल्या आहेत. यातील एक मुलगी उरण येथील चिरनेर येथे तीच्या गावी आजीकडे गेल्याचे समजले. दूसरी मुलगी मुंबई येथील बांद्रा येथे रेल्वे पोलिसांना सापडली. तीच्यासोबत कोण नसल्याने रेल्वे पोलिसांनी या मुलीला डोंगरी येथील बालगृहात ठेवले आहे.
तसेच तीसरी मुलगी सातारा जिह्यातील तीच्या मूळ गावी आईकडे गेल्याचे पोलिसांना समजले. या मुलीला सुद्धा जवळच्या बालगृहात ठेवण्यात आले आहे. तर चौथी मुलगी तळोजा भागात सापडल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली. सध्या बेपत्ता असलेल्या एका मुलीचा शोध घेण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. सदर मुलींना बालगृहात बंदीस्त राहावे लागत होते, त्यांना बालगृहात मनाप्रमाणे राहायला मिळत नसल्याने त्या बालगृहातून पळून गेल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आल्याचेही नितीन ठाकरे यांनी सांगितले.