ठाणे महापालिका महापौर पदी शर्मिला पिंपळोळकर

ठाणेः ठाणे महापालिका महापौर पदी शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका शर्मिला रोहित पिंपळोळकर-गायकवाड यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी भाजप नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. दोन्ही पदांसाठी विरोधी पक्षांनी अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा ३ फेब्रुवारी २०२६ रोजी केली जाईल.

कोपरी भागातील नगरसेविका शर्मिला पिंपळोळकर-गायकवाड यांनी ३० जानेवारी रोजी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला. प्रभाग क्रमांक-११ मधून तीनवेळा निवडून आलेल्या नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ‘भाजपा'च्या वतीने उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही प्रमुख नागरी पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड आता औपचारिकता राहिली आहे.

सुरुवातीला महापौर पदासाठी ‘शिवसेना'कडून (शिंदे गटातून) ७ नावे विचारात होती. तथापि, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा कोपरीवर विश्वास दाखवत शर्मिला पिंपळकर-गायकवाड यांना महापौर पदाची संधी दिली आहे. कोपरीतील प्रभाग क्रमांक-२०मधून गायकवाड सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.

‘भाजपा'ने यापूर्वी महापौर पदावर दावा केला होता आणि जर पद वाटप झाले नाही तर ते विरोधी पक्षात बसतील, असे संकेतही दिले होते. परंतु, अखेर ‘भाजपा'ने सत्ताधारी आघाडीचा भाग राहण्याचा निर्णय घेतला आणि उपमहापौर पदावर तोडगा काढला.  महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार ॲड. निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजप ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले, भाजप गटनेते मुकेश मोकाशी, शिवसेना गटनेते पवन कदम यांच्यासह अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महापौर आणि उपमहापौर पदाची औपचारिक निवडणूक प्रक्रिया ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता महापालिका मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात होईल. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ निवडणूक अधिकारी म्हणून कामकाजाचे अध्यक्षस्थान भूषवतील.
-मनिष जोशी, नगरसचिव, ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अंबरनाथमधील मोक्याची २१० एकर जमीन सरकारच्या स्वाधीन