प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
ई-गव्हर्नन्स क्षेत्रात नवी मुंबई महापालिका राज्यात प्रथम
नवी मुंबई ः महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामगिरीचे सर्वंकष मूल्यमापन करणाऱ्या पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन (PRO) पुणे या त्रयस्थ संस्थेमार्फत जाहीर करण्यात आलेल्या City E-Governance Index (CEGI) 2026 अहवालामध्ये नवी मुंबई महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावून डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात ऐतिहासिक यश संपादन केले आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या या अहवालामध्ये सेवा उपलब्धता, प्रशासनातील पारदर्शकता आणि डिजिटल सुलभता या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित शेकडो निकषांच्या आधारे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पुणे महानगरपालिका दुस-या क्रमांकावर आहे.
नवी मुंबई महापालिकेची ही कामगिरी केवळ एक क्रमांक नसून ती आधुनिक, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाची साक्ष आहे. डिजिटल इंडिया, महाराष्ट्र ई-गव्हर्नन्स धोरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत अशा अनेक उपक्रमांमुळे हे यश शक्य झाले आहे.
महापालिकेच्या विविध नागरिकाभिमुख ऑनलाइन सेवा, सुलभ डिजिटल व्यवहार, कार्यक्षम तक्रार निवारण प्रणाली तसेच www.nmmc.gov.in ही वेबसाईट आणि My NMMC या मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध माहितीची सुसंगतता आणि अद्ययावतपणा यामुळे नवी मुंबई महापालिकेला हा मानाचा प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या या मानांकनाबद्दल महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी माहिती-तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा अभ्यास करताना पीआरओ संस्थेमार्फत प्रामुख्याने अधिकृत वेबसाईट, मोबाईल ॲप आणि सोशल मीडिया हँडल्स या माध्यमांचा विचार करण्यात आला. नवी मुंबईच्या कामगिरीचे विश्लेषण नागरिकांना आणि व्यवसायांना दिल्या जाणाऱ्या सेवांचे वितरण, सरकारी कामातील पारदर्शकता, सेवा वितरणातील सुलभता आणि उपलब्धतेची पातळी या तीन निकषांवर करण्यात आले. मागील वर्षांत महापालिकेने ई-गव्हर्नन्स क्षेत्रात सातत्यपूर्ण सुधारणा करत नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ ऑनलाईन सेवा देण्यावर विशेष भर दिला आहे. डिजिटल माध्यमांतून सेवा विस्तार, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, ट्रॅकिंग सुविधा, तसेच नागरिकांच्या सहभागासाठी विकसित करण्यात आलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सचा सकारात्मक परिणाम या निर्देशांकात दिसून आला आहे.
मागील ५ पाच वर्षात 29 महापालिकांनी ई-गव्हर्नन्स साठी केलेल्या कामांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला असून यावर्षी नवी मुंबई महापालिकेने लक्षणीय कामगिरी करुन 9.11 इतके गुणांक प्राप्त करीत थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली असल्याचे पीआरओचे अध्यक्ष तन्मय कानिटकर यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.