डिजीटल होर्डिंग, सोशल मीडिया, सेल्फी बूथ याद्वारे मतदानाचे आवाहन

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होत असून यामध्ये नवी मुंबईकर मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा, यादृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांचा वापर करून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.

सध्या डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन महापालिकेच्या फेसबुक, इन्स्टा, एक्स, व्हॉट्सॲप चॅनल अशा समाजमाध्यमांतून विविध ग्राफिक्स आणि रील्सद्वारे १५ जानेवारी रोजी प्रत्येक नवी मुंबईकर मतदाराने सकाळी ७:३० ते सायं. ५:३० या वेळेत मतदान करून आपला मतदानाचा हक्क कर्तव्यभावनेने बजावावा आणि संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार अभिमानाने मिरवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

यासोबतच शहरात ठिकठिकाणी असलेल्या डिजिटल बॅनर्सवर मतदानाविषयीच्या आवाहनाचे ग्राफिक्स नागरिकांच्या येता-जाता दृष्टीक्षेपास पडावेत, अशा प्रकारे झळकविण्यात आलेले असून मतदान करण्याविषयी प्रचार-प्रसार करण्यात येत आहे.

महापालिका मुख्यालय तसेच विभाग कार्यालये आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची विभागातील कार्यालये या ठिकाणी निवडणूक मतदानाविषयी सेल्फी बूथ ठेवण्यात आलेले आहेत. तसेच विविध मॉल्स, सर्व डी-मार्ट, नाट्यगृहे आणि वंडर्स पार्क, ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेंट्रल पार्कसारखी उद्याने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वाशी-नेरुळ-ऐरोली रुग्णालये अशा वर्दळीच्या ठिकाणी सेल्फी बूथ ठेवण्यात आले आहेत.

त्यावर असलेल्या ‘मी मतदान करणार’ या संदेशाच्या माध्यमातून नागरिक 'आपण मतदान करणार', असा निर्धार व्यक्त करीत आहेत. शिवाय इतरांनीही मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करीत आहेत. विविध सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केलेल्या या सेल्फी बूथसोबत नागरिकांनी आपले छायाचित्र काढावे आणि आपल्या फेसबुक, इन्स्टा, एक्स, व्हॉट्सॲप स्टेटस अशा सोशल माध्यमांवर अपलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मिरा-भाईंदर महापालिकातर्फे मतदान जनजागृती