प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
नवी मुंबईतील नालेसफाई कामांना डेडलाईन १५ मे
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये पावसाळीपूर्व कालावधीतील नालेसफाई कामांना आधीपासूनच नियोजन करण्यास सुरुवात झाली असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १६ एप्रिल रोजी दिघा विभागापासून सुरुवात करीत ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, महापे, वाशीपर्यंत नालेसफाईच्या कामांची बारकाईने पाहणी केली. दरम्यान, सदर कामे येत्या १५ मे पर्यंत गतीमानतेने आणि व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच लवकरच पुढील विभागांचाही दौरा करणार असल्याचे सांगत नागरिकांना पावसाळी कालावधीत अडचण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
याप्रसंगी आयुक्तांसमवेत शहर अभियंता शिरीष आरदवाड, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, परिमंडळ-१चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, उद्यान विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे तसेच संबंधित विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नालेसफाई करताना सुरुवातीच्या उगमापासून खाडीपर्यंत व्यवस्थित सफाई करुन घ्यावी. गाळाचा अंदाज घेऊन त्या प्रमाणात जेसीबी आणि पोकलनचा उपयोग करावा. दिघा ग्रीन वर्ल्ड जवळच्या नाल्यामधून विविध सुविधांच्या जाड आणि मोठ्या वायर्स जात असल्याने त्या एका बाजुला बांधून घ्याव्यात जेणेकरुन नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाहता राहील, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
नैसर्गिक नाल्यातून वाहणारे पाणी स्वच्छ दिसले पाहिजे यादृष्टीने नाल्यात येणाऱ्या दूषित पाण्याचे उगम शोधावेत आणि ते मलनिःस्सारण वाहिन्यांना जोडावेत अथवा त्यांच्या उगमस्थानी अडवून, त्यावर त्याठिकाणी प्रक्रिया करुन स्वच्छ केलेले पाणी नाल्यात सोडावे या बाबीकडे लक्ष देऊन त्यादृष्टीने नियोजन करावे. नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करून ते वाहते राहतील अशाप्रकारे स्वच्छता करावी. तसेच त्यांच्या काठावरील वाढलेली झाडेझुडपे साफ करुन घ्यावीत. त्याचप्रमाणे पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांकडेही प्राधान्याने लक्ष देत उपाययोजना कराव्यात आणि त्याठिकाणी अधिकची पाणी उपसा पंप व्यवस्था ठेवावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात वाशी, सेक्टर-८ वाशी येथील धारण तलाव (होल्डींग पॉन्ड) परिसरात बांधण्यात येत असलेल्या पंम्पींग स्टेशन बांधकामाचीही आयुवतांनी पाहणी करीत कामाला गती देण्याचे निर्देश दिले. या ठिकाणच्या पलॅप गेटच्या दुरुस्तीसह १० मे पर्यंत येथे पंप उपलब्ध करुन घ्यावेत, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेले १४ धारण तलाव ावी मुंबई शहराचे संरक्षक कवच असून भरतीच्या कालावधीत जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्यास पाणी धारण तलावात साठून राहते. तथापि, मागील काही वर्षात धारण तलावाची मूळ साठवण क्षमता ८० % कमी झाली असून या भागात खारफुटीचीही वाढ झाल्याने पावसाळयात मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि भरतीच्या कालावधीत शहरातील काही अतिसखल भागात काही प्रमाणात पाणी साचत असल्याचे निदर्शनास येत आहे. या अनुषंगाने महापालिकेने ‘आयआयटी'च्या तज्ञांकडून पाहणी अहवाल प्राप्त करुन घेतला असून धारण तलावातील गाळ काढून त्याची क्षमता पूर्वीपेक्षा २० % अधिक करणे यादृष्टीने उच्च न्यायालयाची परवानगी प्रक्रिया सुरु आहे. त्याचप्रमाणे येथील खारफुटीचे पर्यायी जागेत पुनर्राेपण करण्याची मान्यता प्रक्रिया देखील सुरु आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.
महापालिका क्षेत्रातील २८ मोठ्या नाल्यांची स्वच्छता १५ मे पर्यंत व्यवस्थिरित्या पूर्ण करावी. तसेच रस्त्यांच्या बाजुच्या सांडपाणी वाहिन्या आणि गांवठाण, झोपडपट्टी आणि भागातील गटारे यांचीही स्वच्छता ३० एप्रिल पर्यंत पूर्ण करावीत. नमुंमपा क्षेत्रात कार्यरत एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, सिडको, एमएमआरडीए, एपीएमसी अशा सर्व प्राधिकरणांची समन्वय बैठक पुढील आठवड्यात घेतली जाणार असून संबंधित प्राधिकरणांनी आपापल्या क्षेत्रातील पावसाळीपूर्व कामे जलद गतीने पूर्ण करावीत. त्याचा आढावा घेतला जाणार आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.