प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
उल्हासनगरमधील थकीत करदात्यांना सवलत
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील नागरिक, व्यापारी आणि दुकानदारांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने विशेष ‘अभय योजना' जाहीर केली आहे. महापौर अश्विनी निकम यांच्या आग्रहाखातर अभय योजना १३, १४, १५ आणि १६ मार्च अशा ४ दिवसांसाठी राबवण्यात येणार आहे. या कालावधीत थकीत मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना व्याजात १०० टक्के सवलत मिळणार असून, या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर निकम यांनी केले आहे.
महापौर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सदरची माहिती देण्यात आली. महापालिकेचा महसूल वाढावा आणि थकबाकीदारांना आर्थिक दिलासा मिळावा, या हेतुने महापौर अश्विनी निकम यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडे ‘अभय योजना' सुरु करण्याची मागणी केली होती. तसेच ‘उल्हासनगर'चे आमदार कुमार आयलानी यांनी देखील यासंदर्भात आयुक्तांना पत्र देऊन ‘अभय योजना' लागू करण्याची सूचना केली होती.
या योजनेनुसार, ज्या मालमत्ता धारकांचा गृहकर थकीत आहे, त्यांनी नमूद ४ दिवसांच्या कालावधीत कराची मूळ रक्कम एकरकमी भरल्यास त्यांच्यावरील पूर्ण व्याज माफ केले जाणार आहे. वरिष्ठ नगरसेवक महेश सुखरामाणी, जमनू पुरुस्वानी, अरुण आशान, माजी नगरसेवक मनोज लासी आणि कमलेश निकम यांनीही नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त करदात्यांनी या योजनेत सहभागी होऊन आपला कर भरावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नवनिर्वाचित खासदार ज्योतीताई वाघमारे आनंद आश्रमात
‘शिवसेना'च्या ‘राज्यसभा'तील नवनिर्वाचित खासदार ज्योतीताई वाघमारे यांनी १२ मार्च रोजी आनंद आश्रमला भेट दिली. यावेळी त्यांनी टेंभी नाका येथील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन केले. त्याचबरोबर आनंद आश्रमची त्यांनी पाहणी केली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या विविध गोष्टींची पाहणी करत त्यांच्या आठवणींना या ठिकाणी उजळा देण्यात आला. त्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता ‘शिवसेना'च्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘जनसंवाद'ला देखील त्यांनी भेट दिली. याप्रसंगी माजी नगरसेवक अशोक वैती, शिवसेना नेत्या अनिताताई बिरजे, राजेंद्र साप्ते यांच्यासह ‘शिवसेना'चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.