सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या कामांची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
सूर्या पाणी पुरवठा योजनेच्या कामांची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेला सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरु होण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध प्रलंबित कामांची महापौर आणि आयुक्तांनी पाहणी केली. प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली.
‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण'मार्फत सुमारे ४०३ दशलक्ष लिटर प्रति दिन क्षमतेची सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे मिरा-भाईंदर महापालिका, वसई-विरार महापालिका तसेच मार्गावरील ग्रामीण भागास पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठा गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या योजनेच्या प्रलंबित कामांची महापौर डिंपल मेहता आणि आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी २३ एप्रिल रोजी पाहणी केली. सदर पाहणी दौऱ्याप्रसंगी उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील, स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत, शहर अभियंता, दिपक खांबित, कार्यकारी अभियंता शरद नानेगांवकर, उपअभियंता उत्तम रणदिवे तसेच ‘एमएमआरडीए'चे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सदर पाहणीत वसई काशीद कोपर ते चेने जलकुंभापर्यंत २२ कि.मी. लांबीपैकी प्रलबित असलेली सुमारे ६०० मीटर लांबीची जलवाहिनी अंथरण्याच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच वसई खाडी छेदून बोगदा पध्दतीने जलवाहिनी टाकण्याच्या महत्त्वपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या जटील कामाची पाहणी करण्यात आली. तसेच कवडास येथील १३२ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीचे काम ‘महावितरण'मार्फत सुरू असून त्या कामाचीही सविस्तर पाहणी करण्यात आली. याशिवाय चेने येथील खाजगी जागेवरील पुलाच्या बांधकामाची आणि तेथील जलकुंभ उभारणीच्या कामाची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना कामे गतीने आणि गुणवत्तापूर्वक पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
एकंदरीतच महापालिका प्रशासनाकडून सदर प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता नानेगांवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.