नवी मुंबई महापालिकातर्फे मराठीचा जागर

नवी मुंबई : देशात ३ हजाराहून अधिक बोलीभाषा असून बोलीभाषांना इथल्या मातीचा गंध असतो. त्यामुळे बोलीभाषांच्या पायावरच प्रमाण भाषेची इमारत उभी असते, असे मत व्यक्त करीत लेखक गजआनन म्हात्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांंसह ‘आंग्रु डुंग्रू' या कार्यक्रमातून विविध उदाहरणांसह लघुकथा, कविता, धवलेगीत सादर करीत आगरी भाषेतील सौंदर्यस्थळांचे नितांत सुंदर दर्शन घडविले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त २८ जानेवारीपर्यंत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आगरी बोलीभाषेचे महत्व सांगणाऱ्या ‘आंग्रु डुंग्रू' या कार्यक्रमाला उपस्थितीतांची चांगली दाद मिळाली.

नवी मुंबईची ओळख आगरी-कोळ्यांची भूमी आहे. त्यामुळे इथली मूळ बोलीभाषा असणाऱ्या आगरी भाषेतील गोडवा आणि तिचा इतिहास आणि परंपरेची ओळख व्हावी यादृष्टीने ‘आंग्रु डुंग्रू” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आगरी भाषेत विपुल लेखन करणारे साहित्यिक गजआनन म्हात्रे यांच्यासह गायिका संगीता पाटील आणि कवी अजय भोईर यांनी कविता, गीत, लघुकथा सादरीकरणातून आगरी साहित्याची नजाकत पेश केली.

अतिक्रमण विभागाचे उपायुक्त नामवंत गजलकार डॉ. कैलास गायकवाड यांनी प्रत्येक भाषेची स्वतःची अशी सौंदर्यस्थळे असतात असे सांगत आगरी बोलीभाषेचे महत्व विशद केले. याप्रसंगी मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, तानाजी शिंदे, सहा.आयुक्त अरुण पाटील आणि अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची रसिक उपस्थिती होती.

पंधरवडा अंतर्गत आज २३ जानेवारी रोजी, सकाळी ११ वाजता असून महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार आणि शासनाच्या लोकराज्य मासिकाचे माजी संपादक, लेखक तथा माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक सुरेश वांदिले यांचे ‘कार्यालयीन मराठी लेखन आणि मराठी युवकांसाठी करिअरच्या संधी' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. २७ जानेवारी सकाळी ११ वाजता कोल्हापूर जिल्ह्यात ‘वाचनकट्टा' अशी अभिनव संकल्पना शाळा-महाविद्यालयांमध्ये राबवून नव्या पिढीत वाचन प्रेरणा निर्माण करणारे या संकल्पनेचे संस्थापक युवराज कदम यांचा शिक्षक, पालक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी नागरिक यांच्याशी प्रेरणादायी संवाद ‘वाचाल तर वाचाल' संपन्न होणार आहे. या माध्यमातून विशेषत्वाने नवी मुंबईतील शाळा-महाविद्यालयांत वाचनसंस्कृती वाढीसाठीच्या प्रयत्नांना दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

२८ जानेवारी सकाळी ११ वाजता गजलसम्राट सुरेश भट यांचा वारसा जपत मराठी गजलचे दालन समृध्द करणारे सुप्रसिध्द गजलकार आप्पा ठाकूर यांचा ‘गुंतलेले पाश' असा मराठी गजलांचा हृदयस्पर्शी कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्याचदिवशी सायं. ४ वाजता नमुंमपा अधिकारी-कर्मचारी यांच्याकरिता ‘मला आवडलेले मराठी पुस्तक' या विषयावर ‘मनोगत स्पर्धा' आयोजित करण्यात आलेली आहे. यानंतर नमुंमपा अधिकारी, कर्मचारी आणि साहित्यप्रेमी नागरिक यांच्याकरिता ‘शब्दकोडे स्पर्धा' आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये उपस्थितांना उभे-आडवे चौकोन असणारे मराठी शब्दकोडे देण्यात येईल. ते सर्वात जलद सोडविणाऱ्या पहिल्या १० स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील. विजेत्या स्पर्धकांना स्पर्धेनंतर लगेच पारितोषिके प्रदान करण्यात येतील.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता नमुंमपा अधिकारी, कर्मचारी, साहित्यप्रेमी नागरिक यांनी आपली नावे नमुंमपा मुख्यालय येथे तिसऱ्या मजल्यावर माहिती-जनसंपर्क विभागात भ्रमणध्वनी क्र. ९९३००२०८१४ / ७०२१७८०८१३ यावर २७ जानेवारी या अंतिम दिनांकापर्यंत कार्यालयीन वेळेत नोंदवायची आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मराठी भाषा अभिजात झाल्याने बोलींना मान्यता - कवी अरुण म्हात्रे