स्कुल व्हॅनला अपघात, २ विद्यार्थी जखमी  

नवी मुंबई : खाजगी स्कुल व्हॅनवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात स्कुल व्हॅन रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकल्याने स्कुल व्हॅन मधील १० विद्यार्थ्यापैकी २ विद्यार्थी आणि व्हॅन चालक जखमी झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी वाशी सेक्टर-९ मध्ये घडली. वाशी पोलिसांनी या अपघात प्रकरणी स्कुल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याच्या विरोधात कारवाई सुरु केली आहे.  

या अपघातातील जखमी खाजगी स्कुल व्हॅन चालक वाशी परिसरातील विद्यार्थ्यांची ने-आण करतो. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तो वाशीतील फादर ॲग्नल स्कुलमधील १० विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत जात होता. यावेळी अचानक चालकाचे स्कुल व्हॅन वरील नियंत्रण सुटले. त्यामुळे व्हॅन रस्त्यालगत असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात स्कुल व्हॅन मधील २ विद्यार्थी तसेच स्कुल व्हॅन चालक जखमी झाले.  

या अपघातात जखमी झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांना वाशीतील एमजीएम हॉस्पीटलमध्ये उपचार करुन सोडून देण्यात आले आहे. सदर अपघाताला जबाबदार धरुन स्कुल व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली. स्कुल व्हॅनचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे सदरचा अपघात घडल्याचे स्कुल व्हॅन चालकाचे म्हणणे आहे. त्यानुसार स्कुल व्हॅनची ‘आरटीओ'कडून तपासणी करण्यात येणार असल्याचे देखील चांदेकर यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एअर इंडिया'ची नवी मुंबई विमातळावरुन दररोज २० उड्डाणांची घोषणा