बाजारात हापूस आंबा आवक वाढण्यास सुरुवात

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक वाढली आहे.  त्यामुळे हापूस आंबा दरात घसरण झाली असून, हापूस आंब्यासह इतर आंबे सर्वसामान्यांच्या अवाक्यात आले आहेत. मागील आठवड्यात ३ ते ५ डझनला २५०० ते ७००० रुपयांवरुन आता २००० ते ६००० रुपयांनी विक्री होत असून, पुढील काही दिवसांत आवक अधिक वाढून हापूस आंबा दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

यंदा हापूस आंब्याचे उत्पादन चांगले असेल अशी  अपेक्षा केली जात होती. परंतु यंदाच्या हापूस आंबा हंगामाला लहरी हवामानाचा फटका बसल्याने बाजारातील हंगाम  देखील उशिराने सुरु झाला. हंगाम सुरु होताच आवक कमी होत असल्याने हापूस आंबा दर आवाक्याबाहेर होते.गुढीपाडवा पर्यंत हापूस आंब्याचे दर पेटीला ३ ते ९ हजार रुपये पर्यंत होते. पाडवा सरताच मागील आठवड्यात बाजारात हापूस आंबा आवक वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हापूस आंबा दर १० टक्क्यांनी खाली आले होते. आता ३० मार्च पासून हापूस आंबा आवक अधिक वाढली आहे. ३० मार्च रोजी एपीएमसी फळ बाजारात कोकणातून ३४६९० पेट्यांची हापूस आंबा आवक झाली. आता कोकणात उष्णता  वाढत आहे. त्यामुळे आंबा लवकर तयार होत असून, बाजारात अधिक दाखल होत आहे.तूर्तास ३० मार्च पासून हापूस आंबा आवक वाढत चालली असल्याने दर २० टक्क्यांनी खाली उतरले असून पुढील काळात आवक अधिक वाढून हापूस आंबा दर आणखी उतरतील, अशी माहिती एपीएमएसी फळ बाजारातील फळ व्यापारी अक्षय ढेबी यांनी दिली.

Read Previous

१३ ते १६मे दरम्यान वाशीत होणार क्रेडाई-बीएएनएम यांच्या २०व्या मेघा प्रॉपटी प्रदर्शन