उपवन परिसराची महापौरांकडून रात्रीची अचानक पाहणी

ठाणेः उपवन तलाव परिसरात अनधिकृत व्यवसाय, फेरीवाल्यांच्या त्रासाबाबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी प्रशासनास कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनांची अंमलबजावणी होत आहे किंवा कसे, हे पाहण्यासाठी २७ एप्रिल रोजी रात्री महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अचानक उपवन परिसराची पाहणी केली. यावेळी प्रशासनाने उपवन परिसर फेरीवाला मुक्त केल्याबाबत समाधान व्यक्त करत नियमित कारवाई  सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, सहायक आयुक्त गणेश चौधरी आदी अधिकारी उपस्थित होते.

वाढत्या अनधिकृत व्यवसायांबाबत स्थानिक नगरसेविका परिषा सरनाईक व स्थानिक रहिवाशांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची भेट घेवून तिथे होत असलेल्या फेरीवाल्यांबद्दलच्या तक्रारी केल्या होत्या. याबाबत महापौरांनी तात्काळ बैठक लावून संबंधित सहायक आयुक्तांना कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या आदेशांची अंमलबजावणी होत असल्याची खात्री करण्यासाठी महापौरांनी स्वतः सोमवारी रात्री ९ वाजता उपवन परिसराची पाहणी केली.

महापौरांच्या निर्देशानुसार प्रशासनाने परिसरातील अनधिकृत टपऱ्या व फेरीवाल्यांवर कारवाई करत उपवन परिसर फेरीवाला मुक्त केला आहे. ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवावी, अशा स्पष्ट सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पाहणीदरम्यान महापौरांनी परिसरातील स्वच्छता, सुरक्षितता यांचा आढावा घेत नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. विशेषतः महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. उपवन परिसरात फूटपाथलगत सार्वजनिक विभागामार्फत कामे सुरू असून ती कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच  उपवन परिसरात असलेल्या झाडांच्या वाढलेल्या फांद्याची पावसाळ्यापूर्वी छाटणी करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे