अखेर ‘त्या' तरुणाचा मृत्यू

नवी मुंबई : तुर्भेमध्ये जुन्या वादातून क्रिकेट बॅट आणि फायबर रॉडने ३ तरुणांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला किशोर वरक (२९) अखेर उपचारादरम्यान मरण पावला आहे. गेल्या ५ दिवसांपासून वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते; मात्र १२ ऑवटोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. एपीएमसी पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या ६ आरोपींवर आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु केली आहे.

८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तुर्भे, सेक्टर-२१ मध्ये सदरची घडली होती. जुना वाद मिटविण्याच्या बहाण्याने विक्रम उर्फ विकी शत्रुघ्न पाटील या आरोपीने आशुतोष धुर्वे याला आपल्या घरी बोलावले होते. आशुतोष किशोर वरक आणि विकी कांबळे या मित्रांसह विकी पाटील याच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास गेला होता. त्यावेळी विकी पाटील, त्याची पत्नी चारुशिला तसेच मित्र संकेत लाड (लाडू), ओंकार वाघमारे (गण्या), वेदांत उर्फ विश्वेश घरत, झकील शेख, मौलाली उर्फ मौला भंडर आणि इतरांनी या तिघांवर क्रिकेट बॅट, फायबर रॉड आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केला होता.

या हल्ल्यात किशोर वरक गंभीर जखमी झाला होता, तर आशुतोष धुर्वेचा हात फ्रॅक्चर झाला आणि विकी कांबळेच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. गंभीर जखमी झालेल्या किशोरवर वाशीतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. किशोरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्याच्या उपचारासाठी मित्रपरिवार आणि समाजातील नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले होते. अनेकांनी सढळ हस्ते त्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतही केली. परंतु, अखेर सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि किशोरने १२ ऑवटोबर रोजी दुपारी अखेरचा श्वास घेतला.

एपीएमसी पोलिसांनी या घटनेतील विक्रम उर्फ विकी शत्रुघ्न पाटील (३५), संकेत तुकाराम लाड (३७), वेदांत उर्फ विश्वेश प्रेमनाथ घरत (२२), झकील नबीलाल शेख (१९) मौलाली उर्फ मौला नबीलाल शबन भंडर (२६) आणि मौला नबीलाल मकरंद (२६) या ६ जणांना यापूर्वीच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे. किशोरच्या मृत्युनंतर आता पोलिसांनी या सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

क्रिकेटपटू ठरला हल्लेखोरांच्या रागाचा बळी...
मुळचा संगमेश्वर तालुक्यातील आंबेड गावचा रहिवासी असलेला किशोर वरक तुर्भे, सेक्टर-२१ मध्ये आइवडील, भाऊ आणि भावजय यांच्यासह राहण्यास होता. किशोर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू होता. या घटनेमुळे तुर्भे परिसरात शोककळा पसरली असून, एक प्रतिभावान क्रिकेटपटू निर्दय मारहाणीचा बळी ठरल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीतील शिवाजी चौकात आरपीआयची निदर्शने