प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
५५ लाखांचा गुटखा जप्त, ३ चालकांवर कारवाई
भिवंडी : महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणावर भिवंडी परिसरातून केली जात आहे. अशाच एका गुटखा तस्करीची भणक भिवंडी गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे शीतल राऊत यांनी स्वीकारताच लागली. त्यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या सापळा कारवाईत तब्बल ५५ लाखांचा गुटखा जप्त करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात गुन्हे शाखेचे कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस शिपाई विजय कुंभार यांना महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा भादवड मार्गे कल्याण नाका दिशेने घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने आसबिबी मशीद येथील रस्त्यावर सापळा कारवाई केली. त्यावेळी संशयित टेम्पो (एमएच-०४ एलई-३९१०), (एमएच-०४ एमआर-३३९१) आणि ट्रक (डीडी-०१ एफ-९१०२) यांना थांबवून तपासणी केली असता या तीन वाहनांमध्ये ५४ लाख ९९ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. गुन्हे शाखेच्या पथकाने २० लाख रुपये किंमतीचे टेम्पो आणि गुटखा असा ७७ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत टेम्पो चालक संजय मस्कर, अक्षय गुडेकर आणि अजीम वाहिद शेख या तिघाांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द भिवंडी शहर पोली ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी करीत आहेत.