प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
पामबीच हिट-अँड रन
नवी मुंबई : पामबीच मार्गावर सानपाडा येथे ३ मार्च रोजी पहाटे झालेल्या भीषण हिट-अँड-रन प्रकरणात प्रशांत जमदाडे या २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला होता. तर त्याच्यासोबत असलेली १७ वर्षीय हरमन कौर नामक मुलगी गंभीर जखमी झाली असून ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून प्रशांत आणि हरमन यांना चिरडणाऱ्या स्कोडा आणि मारुती ब्रेझा या दोन कारची आणि कार चालकांची ओळख पटवली असून त्यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
कोपरखैरणे येथील रहिवासी प्रशांत जमदाडे ३ मार्च रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरुन पामबीच मार्गावरुन कोपरखैरणे येथे येत होता. यावेळी त्यांची दुचाकी सारसोळे जंक्शन आणि मोराज सर्कल दरम्यानच्या वळणावर आली असताना अचानक घसरली. त्यामुळे प्रशांत आणि हरमन कौर दोघेही रस्त्यावर पडले. याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दोन कार त्यांच्या अंगावरुन गेल्या. सदरचा अपघात इतका भीषण होता की, प्रशांतचे शिर धडावेगळे झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर हरमन कौर गंभीर जखमी झाली.
अपघातस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याने सानपाडा पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला. पोलिसांनी सारसोळे आणि मोराज सर्कल येथील फुटेज तपासून त्या वेळेत गेलेल्या वाहनांचे विश्लेषण केले. तपासात स्कोडा (चालकसागर सांडा, २३) आणि मारुती ब्रेझा (चालक कृष्णा रावरिया, २०) या दोन कारची ओळख पटली आहे. दोघेही घणसोलीचे रहिवासी असून, अपघाताच्या वेळी त्यांच्यासोबत कारमध्ये मित्रही असल्याचे आढळून आले. त्यानुसार या अपघातातील दोन्ही कार ताब्यात घेण्यात आल्या असून दोन्ही कारच्या चालकांवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल मुंडे यांनी दिली.
हरमनची मृत्यूशी झुंज; मदतीचे आवाहन
अपघातात गंभीर जखमी झालेली १७ वर्षीय हरमन कौर सध्या नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. ती अद्याप बेशुध्द असल्याने तिचा जबाब नोंदवता आलेला नाही. हरमनची आई घरात एकटीच कमावणारी असून, मुलीच्या उपचारासाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चासाठी त्यांची धडपड सुरु आहे. उपचारासाठी निधी उभारण्यासाठी कुटुंबियांनी आता क्राऊडफंडिंगचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.