म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
खासदार आपल्या भेटीला
नवी मुंबई : खासदार आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत वाशी मधील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय -खासदार जनसंपर्क कार्यालय येथे शेकडो नागरिकांनी खासदार नरेश म्हस्के यांना भेटून त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. सदर समस्या खासदार म्हस्के यांनी जागच्याजागी बसून संबंधीत यंत्रणेला फोन लावून सोडविण्यावर भर दिला. यात बोनकोडे-खैरणे गावातील ग्रामस्थांच्या समस्या प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खा. नरेश म्हस्के यांनी खासदार आपल्या भेटीला या उपक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबईतील नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. २७ फेब्रुवारी रोजी वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय तथा खासदार संपर्क कार्यालयात खासदार आपल्या भेटीला उपक्रम पार पडला. यावेळी सकाळपासूनच नवी मुंबईतील विविध नोड मधील नागरिकांनी आपल्या समस्या खासदारांसमोर मांडण्यासाठी गर्दी केली होती. सुमारे ७०० नागरिकांनी आपल्या विविध समस्यांची गाऱ्हाणी मांडली.
यामध्ये प्रामुख्याने सिडकोनिर्मित घरांची हस्तांतरण प्रक्रिया पुन्हा सुरु करणे, कंडोनिमियम अंतर्गत नागरी कामे महापालिकेने करुन देणे, मूळ गांवठाणातील गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, रुग्णालयातील बिल कमी करुन देणे,शाळेची फी भरणे ,वाहतूककोंडी, नालेसफाई करुन घेणे, आदि विविध प्रकारच्या समस्या नागरिकांनी मांडल्या. ज्यांचे निराकरण खासदार म्हस्के यांनी त्वरित संबंधीत विभागाला फोन करून सोडविण्यावर भर दिला. यावेळी काही समस्या जागच्या जागी सोडविण्यात आल्या. त्यामुळे समस्या सोडविल्याबद्दल नागरिकांनी खा, नरेश म्हस्के यांचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हाध्यक्षा शीतल कचरे, सरोज पाटील, माजी नगरसेवक शिवराम पाटील तसेच शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्या प्रभागातील जनतेच्या समस्या घेऊन उपस्थित होते. दरम्यान, समस्या जाणून घेतल्यानंतर खासदार म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करावे याबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन मार्गदर्शन केले.
खैरणे-बोनकोडे गावातील नागरिकांनी गावातील अनधिकृत बांधकामे, सतत होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे स्थानिकांना ये-जा करताना होणारी अडचण, नायजेरियन नागरिकांचे वाढलेले प्रस्थ आणि त्यांच्यामार्फत होणारे अंमली पदार्थांचे व्यवसाय आणि ग्रामस्थांना मैदानाचा भूखंड नसणे अशा विविध प्रकारच्या समस्या खा. नरेश म्हस्के यांच्याकडे मांडल्या. इतकी वर्षे येथील नेत्यांच्या घरात मंत्रीपद, खासदारकी, आमदारकी, महापौरपद अशी सत्तापदे असूनही गावातील समस्या जैसे थे असल्याने चर्चेला उधाण आले होते.
नामदार गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला उत्तर म्हणून तुम्ही खासदार आपल्या भेटीला उपक्रम सुरु केला आहे अशी विचारणा मला झाली. दरबार भरण्यासाठी मी काही राजा महाराजा नाही आणि आमची कुणाशीही स्पर्धा अथवा वाद नाही. येथील जनतेने मला भरघोस मतदान दिलेले असून त्यांच्या समस्या सोडविणे माझे कर्तव्य असल्याने मी या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आलेलो आहे.
-खासदार नरेश म्हस्के, ठाणे.