रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटिव्ही वॉच
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी ग्रामपंचायत हद्दीत आणि महामार्गाच्या कडेला बेजबाबदार नागरिकांकडून कचरा टाकण्याचे पराक्रम सुरु असल्याने कऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या नागरिकांना अद्दल घडावी म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने आता कठोर पाऊल उचलले आहेत. रस्त्याच्या कडेला कचरा टाकताना दिसल्यास थेट त्यांना शासकीय दाखले दंड भरल्याशिवाय न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कचरा टाकून परिसराची अब्रू वेशीला टांगणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने देखील आक्रमक पवित्रा घेतला असून जाहीर फलकबाजी करण्यात आली आहे.
नेवाळी ते मलंगगड रस्ता आणि डोंबिवली-अंबरनाथ महामार्गाच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झालेले असतात. या कचऱ्याचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने केल्यानंतर देखील पुन्हा नागरिकांकडून कचरा टाकण्याचे पराक्रम सुरु ठेवले जात आहेत. कचरा संकलनासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने घंटागाड्यांची व्यवस्था करुन देखील नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे आता रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांविरोधात ग्रामपंचायत प्रशासन आक्रमक झाले आहे. रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर ‘सीसीटिव्ही'द्वारे नजर ठेवली जात आहे. यात कचरा टाकताना दिसणाऱ्या व्यक्तीला थेट दंडात्मक कारवाईला समोर जावे लागणार आहे. मात्र, या कारवाईला देखील न जुमानणाऱ्या नागरिकांना थेट शासकीय दाखले न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
ग्रामपंचायतीच्या महसुली हद्दीत सर्रास टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी आणि कचरा पेटवल्यामुळे परिसरात प्रचंड धुराचे साम्राज्य निर्माण झालेले असते. परिसरातील शाळा, दुकान आणि बाजारपेठेला याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने सुविधा उपलब्ध असताना देखील नागरिकांकडून आवाहनाला साकारात्म प्रतिसाद दिला जात नसल्याने आता ग्रामपंचायत प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.
२ दिवसांपासून सुरु असलेल्या या कारवाईत स्वतः ग्रामविकास अधिकारी वैभव पडवळ आपल्या पथकासह नागरिकांना समज देत आहेत. मात्र, समज देऊन सुध्दा नागरिक ऐकत नसल्याने प्रशासनाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे कचरा टाकण्याचे प्रमाण पहाटे आणि रात्रीच्या वेळेत सुरु असल्याने खडा पहारा प्रशासनाकडून द्यावा लागत आहे.
डोंबिवली-अंबरनाथ महामार्गावर नेवाळी सह आजुबाजुच्या शहरातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून कचरा टाकला जात आहे. कचरा टाकण्याचे प्रकार ग्रामपंचायतीच्या ‘सीसीटिव्ही'मध्ये कैद देखील झाले आहेत. कचऱ्याचे ढिगारे दिसत असल्याने कचरा टाकत असल्याचे वाहन चालक सांगत आहेत. मात्र, अशा वाहन चालकांना देखील ग्रामपंचायत प्रशासनाकडून समज दिली जात आहे.
नेवाळीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आम्ही आवाहन सुध्दा केले आहे. मात्र, काही नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे जे कचरा टाकताना दिसतील त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. परिणामी, शासकीय दाखले देखील त्यांना देणार नाही.
-वैभव पडवळ, ग्रामविकास अधिकारी, नेवाळी.