प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
प्रकाश महाजन यांचा ‘शिवसेना’मध्ये प्रवेश
ठाणे : ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत २६ डिसेंबर रोजी ‘शिवसेना’मध्ये जाहीर प्रवेश केला. प्रकाश महाजन संयमी आणि मुद्देसूद बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्षप्रवेशाने यापुढे ‘शिवसेना’ला बळकटी मिळेल आणि ते ‘शिवसेना’चे काम जनतेपुढे प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
तर हिंदुत्वाविषयी जागरूक असलेले नामदार एकनाथ शिंदे कडवे हिंदुत्ववादी नेते आहेत. हिंदुत्वावर काम करण्याची इच्छा असल्याने ‘शिवसेना’मध्ये पक्षप्रवेश केला. तर शिवसेना पक्षप्रवेशासाठी मंगेश चिवटे यांचे महाजन यांनी यावेळी आभार मानले.
"महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले जे घरात बसून राहिले, परीक्षेला बसले नाहीत; पण पहिले आले. मात्र, एकनाथ शिंदे याला अपवाद ठरले. ते परीक्षेला बसले आणि पहिले आले," अशा शब्दांत महाजन यांनी ना. शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे कौतुक केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून हजारो रुग्णांना रोगमुक्त करण्याचे काम ना. शिंदे यांनी कोणताही गाजावाजा न करता शांततेत केले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून बरे झालेल्या रुग्णांनी शिंदे यांना आभारपत्रे पाठवली, त्या पत्रांचे वजन १०० किलो आहे. असे दृश्य आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दाखवले नाही. तरीही याचा कुठेही ना. एकनाथ शिंदे यांनी गाजावाजा केला नाही, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजप पक्षामध्ये सन्मानजनक युती होईल. त्याला १-२ दिवसांत अंतिम स्वरूप दिले जाईल. युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. ते प्रत्येक महापालिकेचा आढावा घेत आहेत. शिवसेना आणि भाजप विचारांची युती आहे. केंद्रात एनडीए सरकार आणि महाराष्ट्रात ‘महायुती’चे सरकार आहे. बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम शिवसेना करीत आहे. काहीजण स्वार्थासाठी, सत्तेसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी युती करीत आहेत, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘शिवसेना उबाठा-मनसे’ युतीवर लगावला.
आगामी महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांचे विचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जातोय. यात महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.