रानडुक्करांची शिकार, वन विभागाचे दुर्लक्ष
उरण : उरण तालुक्यातील डोंगराळ तसेच खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीच्या जंगलात रानडुक्करांची शिकार केली जात आहे. त्यामुळे रानडुक्करांची जात संपुष्टात येण्याची भिती व्यवत केली जात आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकारांकडे दुर्लक्ष न करता वन प्राण्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी वन्यप्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे.
उरण तालुक्याला वनसंपदेचे वरदान लाभले असताना या तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण वाढू लागले आहे. अशा वाढत्या औद्योगिकीकरणामुळे डोंगर टेकड्यांचा ऱ्हास होत असल्याने हरीण, ससा, भेकर, बिबट्या, मोर, रानडुक्कर यासह इतर वन्यप्राण्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे. त्यात सध्या डोंगराळ तसेच खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीच्या जंगलातील रानडुक्करांनी आपला मोर्चा भातशेतीत आढळून येणारे खेकडे खाण्याकडे वळविला आहे.
परतु, या रानडुक्करांची शिकार करण्यासाठी काही शिकारी धडपडत आहेत. त्यामुळे रानडुक्करांची जात संपुष्टात येणार आहे. यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष न करता वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याची मागणी वन्यप्राणी मित्रांकडून करण्यात येत आहे.