प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
तळोजामधील ३ कारखान्यांना भीषण आग
पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीत भीषण आगीची घटना घडली. येथील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील ३ कारखान्यांना एकाच वेळी आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. २५ डिसेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास लागलेली सदर आग पहाटे ५.३० वाजेपर्यंत आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कारखान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक बी-४२ वरील विघ्नहर्ता कंपनीमध्ये अगरबत्ती निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांची सुमारे १५० पिंपे साठवण्यात आली होती. या पिंपांमधील सॉल्व्हन्ट रसायनांनी अचानक पेट घेतल्याने भीषण स्फोट झाले आणि आगीने उग्र स्वरूप धारण केले. स्फोटाच्या तीव्रतेमुळे कारखान्यातील लोखंडी पत्रे तुटून थेट रस्त्यावर कोसळली. उडालेल्या रसायनांमुळे कंपनीसमोरील रस्ता आणि गटारांमधून आग पसरत गेली आणि लगतच्या आणखी बी-४१ आणि बी-४३ या दोन कारखान्यांनाही तिचा फटका बसला.
आगीचे लोण वाढत असल्याचे लक्षात येताच कारखान्यातील कामगारांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर पळ काढला आणि स्वतःचे प्राण वाचवले. तळोजा एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी रत्नाकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १०.१५ वाजता आगीची माहिती मिळताच वाहतूक कोंडी असूनही अवघ्या पाच मिनिटांत अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीची तीव्रता पाहता अतिरिक्त बंब मागवण्यात आले. पहाटेपर्यंत सतत पाणी आणि फोमचा मारा करून अखेर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र, रसायनांनी पेट घेतल्यामुळे आग अधिक पसरली.