निवारा केंद्र नावालाच; उड्डाणपुलांखाली झोपणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी

भिवंडी : कामगार नगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहरात देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक रोजगाराच्या शोधात भिवंडीत येतात. मात्र, अनेक कामगारांसह वृध्दांना आसरा नसल्याने अनेक जण उड्डाणपुलाखाली, दुकानांच्या पायऱ्यांवर अथवा मिळेल त्या छताखाली आसरा घेत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत ‘बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था'तर्फे सहारा शहरी बेघर निवारा केंद्र शहरातील बसस्थानकाच्या बाजुला बनविण्यात आले होते. मात्र, या बेघर निवारा केंद्राची इमारत धोकादायक झाल्याने सध्या सदर बेघर निवारा केंद्र भादवड येथील एका इमारतीत स्थलांतरीत करण्यात आले आहे. या ठिकाणी एकाच इमारतीत पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यावर महिला तसेच पुरुषांसाठी बेघर निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र, या निवारा केंद्राबाबत शहरातील बेघरांमध्ये फारशी जनजागृती अथवा माहिती नसल्याने अनेक बेघरांना शहरातील उड्डाणपुलाखालीच आपला निवारा घेण्याची वेळ आली आहे.

भिवंडी-कल्याण मार्गावरील स्व.बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाखाली भादवड, टेमघर, नवी वस्ती, रावजी नगर, कल्याण नाका आदि भागात उड्डाणपुलाखाली अनेक बेघर भर पावसातही आपली रात्र काढत असतात. तर स्व. राजीव गांधी उड्डाणपुलाखाली वंजारपट्टी नाका, बंद पडलेल्या बेघर निवारा केंद्रालगत असलेल्या बस स्थानकाच्या बाजुला उड्डाणपुलाखाली अनेकांनी आपला निवारा आणि आसरा केला आहे. दिवसभर मोलमजुरी करुन अनेक जण याच उड्डाणपुलांखाली रात्रीचा निवारा घेत आहेत. भिवंडी महापालिकेच्या प्रभाग समिती क्र.२ च्या कार्यालयावर पहिल्या आणि दुसऱ्या मळ्यावर महिला तसेच पुरुषांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र बनविण्यात आला असून या निवारा केंद्रात सुमारे ३० महिला आणि ३० ते ३२ पुरुष निवारा घेत असून सर्वजण ज्येष्ठ नागरिक आहेत. येथील महिला आणि पुरुषांना बेडस्‌ची व्यवस्था त्याचबरोबर सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

हजारो कामगारांचे शहर असलेल्या भिवंडी शहरात केवळ एकाच इमारतीत दोन बेघर निवारा केंद्र असल्याने शहरातील इतर बेघरांना आसरा द्यायचा कोणी? सदर खरा प्रश्न असून बेघरांचा प्रश्न शहरात गंभीर बनला असून उड्डाणपुल, मंदिर, मस्जिद, दुकानांच्या पायऱ्या यावर आसरा घेणाऱ्यांची संख्या शहरात वाढली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन याकडे लक्ष देऊन येथील बेघरांना निवारा देणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळच्या सिद्धी वनमाळीची राष्ट्रीय पातळीवर तिहेरी कामगिरी