बनावट कागदपत्रांद्वारे शिक्षकाला पदोन्नती
उल्हासनगरः उल्हासनगर कॅम्प-३ मधील अनिल अशोक सिनेमाजवळील गुरु गोविंदसिंग हिंदी हायस्कूल शाळेत पदोन्नतीसाठी बनावट दस्तऐवज तयार करुन शाळा व्यवस्थापनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पदोन्नती घेतलेल्या आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पदोन्नतीसाठी त्याला मदत करणारा एक बडतर्फ शिक्षक आणि प्रभारी मुख्याध्यापिका फरार झाली आहे.
उल्हासनगर कॅम्प-३ मधील अनिल अशोक सिनेमाजवळील गुरु गोविंदसिंग हिंदी हायस्कूल नामक शाळा आहे. या शाळेची संस्था उल्हासनगर टिचर्स एज्युकेशन सोसायटी असून संस्थेच्या अध्यक्षा परविंदरकौर मुधर यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार बडतर्फ मुख्याध्यापक त्रिभुवनदास सिताराम तिवारी, त्यांचा भाऊ शिक्षक राजेशकुमार सिताराम तिवारी तसेच प्रभारी मुख्याध्यापिका सुनिता चंद्रमौली सिंंग यांनी मिळून कटकारस्थान रचले. त्रिभुवनदास तिवारी यांनी संस्थेच्या कोणत्याही पदावर नसतानाही संस्थेच्या लेटरहेडवर खोटा आदेश तयार करुन त्यामध्ये शिक्षक राजेशकुमार तिवारी यांना पर्यवेक्षक पदावर पदोन्नती दिल्याचे दाखविले. संबंधित आदेश ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग असा दाखवण्यात आला; मात्र तो पूर्णतः बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर खोटा दस्तऐवज प्रभारी मुख्याध्यापिका सुनिता सिंग यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यात त्यांच्या स्वतःच्या स्वेच्छानिवृत्तीचा उल्लेख असतानाही त्यांनी दुर्लक्ष करुन १५ जुलै २०२५ पासून राजेशकुमार तिवारी यांना पदोन्नती देणारा आदेश मंजूर केला. सदर कृत्यामुळे शिक्षण विभाग, संस्था आणि शाळेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून सदर तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेशकुमार सिताराम तिवारी यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. दरम्यान, राजेशकुमार तिवारी यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.