सिडको भवन येथे सावित्रीमाई फुले जयंती साजरी

नवी मुंबई : सिडको भवन येथे सावित्रीमाई फुले जयंती कार्यक्रम ६ जानेवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन ‘सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन'मार्फत करण्यात आले होते. याप्रसंगी ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा अतिरिक्त मुख्य नियोजनकार (नैना) डॉ. प्रिया के., ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष सुभाष पाटील, सरचिटणीस तथा ‘सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन'चे अध्यक्ष नितीन कांबळे, योगेश ठाकूर,  कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या ॲड. सुजाता जाधव तसेच विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.  

या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना मुकआय दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांनी सावित्रीमाईंच्या कार्यामुळे स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली असून आजच्या काळात वंचित स्त्रियांपर्यंत सावित्रीमाईंचा विचार पोहोचविणे सावित्रीमाईंना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे मत व्यक्त केले.

ॲड. सुजाता जाधव यांनी स्त्रियांना शिक्षण, स्वयंनिर्णय तसेच व्यक्त होण्याचा अधिकार मिळवून देण्याचे श्रेय सावित्रीमाईंना जाते, असे विचार मांडले.

प्रिया के. यांनी सावित्रीमाईंनी ज्ञानाचा प्रकाश स्त्रियांपर्यंत पोहोचविल्यानेच आज स्त्रिया विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवित असल्याचे मत व्यक्त केले.

सावित्रीमाई फुले जयंती निमित्ताने सिडको महामंडळातील कर्तृत्वान महिलांना ‘सावित्रीच्या लेकी' या विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतो. या वर्षीच्या ‘सावित्रीच्या लेकी' या पुरस्काराने अधीक्षक अभियंता (प्र) शांता पनीकर, आणि लेखा सहाय्यक तेजस्वी सावंत यांना सन्मानित करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘टीओडी मीटर'द्वारे १२.८१ लाख ग्राहकांना ४.१३ कोटींची सवलत