महापालिका रक्तपेढी मध्ये रक्ताची कमतरता; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन

वाशी : नवी मुंबई महापालिका रक्तपेढीत सध्या गंभीर रक्ततुटवडा निर्माण झाला असून, रुग्णांच्या उपचारांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. विशेषतः अपघात, कर्करोग, थॅलेसेमिया आणि प्रसूतीसारख्या अत्यावश्यक उपचारांसाठी लागणाऱ्या रक्ताचा पुरवठा अपुरा पडत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रवत मिळविण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.

वाशी येथील नवी मुंबई महापालिका प्रथम संदर्भ रुग्णालय मधील रक्तपेढीत काही रक्तगटांचा साठा कमी होत आल्याची माहिती समोर आली आहे. ‘ओ' पॉझिटिव्हसारख्या महत्त्वाच्या रक्तगटाचाही तुटवडा जाणवत असून, गरज पडल्यास नातेवाईकांनाच रक्तदाते शोधावे लागत आहेत.

सुट्ट्यांचा कालावधी, महाविद्यालये बंद असल्याने आणि रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने रक्तसंकलनात मोठी घट झाली आहे. परिणामी, शस्त्रक्रिया आणि तातडीच्या उपचारांदरम्यान रक्त उपलब्ध करुन देताना वैद्यकीय यंत्रणेस अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, नवी मुंबई शहरात एकूणच रक्तसाठा मर्यादित असल्याने काही रक्तपेढ्यांमध्ये फक्त काही दिवस पुरेल इतकाच रवतसाठा उरल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात रवताची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाने नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांना पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.

‘रक्तदान हेच जीवनदान' या भावनेतून अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन वैद्यकीय सेल समाजसेविका सरिता खेरवासिया आणि ५० वेळा रवतदान करणारे सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाजी कचरे यांनी केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवा स्थानकाशेजारी कचऱ्याचे ढीग