प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूकविषयक जाहिरातींना बंदी

मुंबई : महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याने, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमाद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिध्द किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.

‘राज्य निवडणूक आयोग'कडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. ‘आयोग'चे सचिव सुरेश काकाणी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महापालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. संबंधित अधिनियमातील तरतुदींनुसार मतदान समाप्तीच्या ४८ तास आधी म्हणजे १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपेल. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिध्द अथवा प्रसारित करता येणार नाही. त्यामुळे जाहीर प्रचाराच्या समाप्तीनंतर मुद्रित माध्यमांच्या जाहिरातीच्या पूर्वप्रमाणनाचा किंवा परवानगीचा प्रश्न उद्‌भवत नाही. यासंदर्भातील सविस्तर बाबी ‘राज्य निवडणूक आयोग'च्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण-जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५' मध्ये नमूद केल्या आहेत, असे आयुवत वाघमारे यांनी सांगितले.

यावेळी सचिव काकाणी यांनी तपशिलवार सादरीकरण केले. इच्छुक उमेदवाराचे नाव संबंधित महापालिकेच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे; परंतु सूचक आणि अनुमोदकाचे नाव मात्र उमेदवार निवडणूक लढवत असलेल्याच प्रभागात असणे आवश्यक आहे. पक्षाच्या उमेदवारास आणि अपक्ष उमेदवारासही प्रत्येकी एक सूचक आणि एका अनुमोदकाची आवश्यकता असते. एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागात नामनिर्देशनपत्र भरु शकतात; परंतु एका उमेदवारास एका प्रभागातील एकाच जागेसाठी निवडणूक लढविता येते आणि एका जागेसाठी जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतात, असे काकाणी यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

प्रकाश महाजन यांचा ‘शिवसेना’मध्ये प्रवेश