पनवेल पंचायत समिती सभापतीपदी रंजना वास्कर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील
महापालिका निवडणुकीसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांत, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी ३ मनाई आदेश जारी करत कडक पोलीस बंदोबस्त आणि व्यापक कारवाई आराखडा अमलात आणला आहे. सदर आदेश १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
‘राज्य निवडणूक आयोग'ने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान होणाऱ्या सभा, रॅली, पदयात्रा, रोड शो आणि चौक सभा यांसाठी मार्ग, वेळ आणि ठिकाणाबाबत पोलिसांची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. ध्वनीक्षेपकांच्या वापराची वेळ आणि आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्यांविरुध्द तात्काळ कारवाई केली जाणार आहे.
सार्वजनिक रस्ते आणि जागांवर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे बॅनर्स, झेंडे, पोस्टर्स, कटआउटस् लावण्यास मनाई करण्यात आली आहे. खाजगी इमारत किंवा आवारात प्रचार साहित्य लावायचे असल्यास जागा मालकाची लेखी परवानगी आवश्यक असून, त्याची प्रत पोलीस आणि निवडणूक यंत्रणेकडे सादर करावी लागणार आहे.
निवडणूक कालावधीत शस्त्र परवानाधारकांना शस्त्र आणि अग्निवस्त्रे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ज्यांच्याकडे परवानाधारक शस्त्र आहेत, ते संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींना संरक्षणाची आवश्यकता आहे, अशा व्यक्तींना शस्त्र ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. प्रचार, सभा, रॅली आणि रोड शो दरम्यान कोणालाही शस्त्र बाळगता येणार नाही.
निवडणूक काळात नियमित कारवाया अधिक तीव्र करण्यात आल्या असून अँटी ड्रॅग स्कॉड, भरारी पथके आणि स्थिर पथके संपूर्ण कार्यक्षेत्रात तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत गैरप्रकार, अवैध दारु, पैशांचे वाटप, मतदारांवर दबाव आणण्याचे प्रकार रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
पोलीस रेकॉर्डवर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली असून त्यांना निवडणूक काळात नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच प्रलंबित समन्स आणि वॉरंट बजावणीची विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
निवडणूक काळात ॲट्रॉसिटी स्वरुपाचे गुन्हे तसेच मागील निवडणुकीदरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यांचा इतिहास तपासून त्या अनुषंगाने संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणतीही जातीय, सामाजिक किंवा राजकीय तेढ निर्माण होणार नाही, यासाठी गुप्त माहिती संकलन आणि सतत नजर ठेवली जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्णतः शांत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी नवी मुंबई पोलीस प्रशासनाकडून सर्वसमावेशक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अँटी ड्रॅग स्कॉड, भरारी आणि स्थिर पथकांच्या माध्यमातून सतत तपासणी सुरू असून, गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई, समन्स-वॉरंट मोहीम आणि संवेदनशील गुन्ह्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे यांनी दिली.