निवडणूक प्रक्रियेवर ३३० सीसीटिव्ही कॅमेऱ्याची नजर

ठाणे : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत निवडणूक अधिकारी यांची कार्यालये, स्ट्राँग रुम, ईव्हीएम कमिशनिंगचे ठिकाण, साहित्य वाटपाची ठिकाणे, संवेदनशील आणि अति संवेदनशील मतदान केंद्रे, मतमोजणीचे ठिकाणे, मुख्य स्ट्राँग रुम, चेक पोस्ट आदिंवर काटेकोर लक्ष ठेवण्याकरिता तसेच निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी आत्तापर्यंत एकूण ३३० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून आवश्यकतेनुसार अजून कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.

निवडणूक प्रक्रियेकरिता लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे सर्व कामकाज महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदशनाखाली सुरु असून नोडल अधिकारी म्हणून उपायुक्त मनिष जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रभागनिहाय स्ट्राँग रुम आणि निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) कार्यालयांमध्ये कॅमेरे बसविण्यात आले असून त्यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग कार्यालय आणि न्यू होरायझान स्कूल, हिरानंदानी इस्टेट येथील स्ट्राँग रुम ५२, वर्तकनगर ४३, लोकमान्यनगर ३१, वागळे आयटीआय २५, नौपाडा-कोपरी कार्यालय आणि ठाणा कॉलेज येथील स्ट्राँग रुम २६, उथळसर २४, कळवा प्रभाग कार्यालय आणि सह्याद्री शाळा येथील स्ट्राँग रुम या ठिकाणी मिळून १२, कॅमेरे मुंब्रा (२६-३१ प्रभाग) २१, मुंब्रा (३०-३२ प्रभाग) १९, दिवा (२७-२८ प्रभाग) १७ तसेच दिवा (२९-३३ प्रभाग) २५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी मिळून २९५ कॅमेरे सद्यस्थितीत कार्यरत आहेत.

याशिवाय मुख्य स्ट्राँग रुम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, बेथनी हॉस्पीटलच्या बाजुला) येथे ३० कॅमेरे, प्रभाग निहाय वाटप करण्यात येणारे मुख्य साहित्य वाटपाचे ठिकाण टाऊन हॉल असून या वाटप केंद्रावर १ कॅमेरा, तर मॉडेला चेक पोस्ट नाका येथे २ कॅमेरे आणि श्रीनगर चेक पोस्ट नाक्यावर २ कॅमेरे बसविण्यात आले असून एकूण आत्तापर्यंत कार्यान्वित असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची संख्या ३३० इतकी आहे.

स्ट्राँग रुममध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशिन्सच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक प्रभागात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्राँग रुममधील कॅमेऱ्यांचे थेट निरीक्षण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना स्वतंत्र युजर आयडी आणि पासवर्ड देण्यात आले असून या संपूर्ण व्यवस्थेवर उपायुक्त मनिष जोशी यांचे लक्ष आहे.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर अखंड लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार कंत्राटदाराकडून आणखी नवीन कॅमेरे लावून ते कार्यान्वित करण्यासाठी एवूÀण ११ निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयनिहाय ठाणे महापालिका शहर विकास विभागाकडील ११ भूमापकांची निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण तांत्रिक यंत्रणेवर देखरेखीसाठी उपायुक्त मनिष जोशी यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता वामन सखदेव, कार्यकारी अभियंता शशिकांत साळुंखे आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी उपअभियंता अतुल भोळे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.

कमांड सेंटर कार्यान्वित करणार...
याशिवाय ठाणे महापालिका मुख्य कार्यालय येथे मुख्य कमांड सेंटर देखील कार्यान्वित करण्यात येणार असून, या मुख्य कमांड सेंटरमध्ये आत्तापर्यंत लावण्यात आलेल्या विविध कॅमेरांचे लाईव्ह स्ट्रीमिंग देखील दृश्य स्वरुपात पाहता येणार आहे.

या सर्व व्यापक उपाययोजनांमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी आयुक्त सौरभ राव नमूद केले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत ‘भाजप'ला पहिला झटका