रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘पं. राम मराठे महोत्सव'ची सांगता
ठाणे : नर्तनातील भावतरंग, नृत्याचे लयबध्द घुंगरु, गायनाचे स्वरमधुर सूर, हार्मोनियमच्या सुरेल कळा, तालवाद्याचा अद्वितीय झंकार.. आणि जय जय गौरीशंकर या संगीत नाटकाने भारावलेले रसिक.. वन्समोअरची दाद... अशा सांगितीक वातावरणात ठाणे महापालिका आयोजित पं. राम मराठे महोत्सवाचा अखेरचा दिवस प्रेक्षकांना एक अनोखी भेट देणारा ठरला.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ५ ते ७ डिसेंबर या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे ३० वा संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त-२ प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, पं. मुकुंद मराठे, पं. विवेक सोनार, ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. मंजिरी देव, तबलावादक रवी नवले तसेच ठाणेकर रसिक उपस्थित होते.
समारोपाच्या दिवशीचे सकाळचे पहिले सत्र कथ्थक नृत्यांना वैशाली वैशंपायन पोतदार यांची एकल कथक नृत्याने गुंफले. गणेश वंदना, ताल प्रस्तुती आणि ठुमरी असा पारंपरिक कथक नृत्य क्रम त्यांनी सादर केला. पंडिता गुरु रोहिणी भाटे रचित गणेश वंदनेने त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तीन तालप्रस्तुती मध्ये उठान, थाट, आमद, लयीत सादर करत प्रेक्षकांना आनंद देत वाढत्या लयीसोबत तडफदार बंदिशींची मालिका सादर केली.
दुसरे पुष्प गायिका सावनी पारेकर यांनी गुंफले. गानहिरा पुरस्कार प्राप्त आणि युवा गायिका असा नावलौकिक असलेल्या सावनी पारेकर यांनी शास्त्रीय गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग विभास मारवा थाटातील तीन रचना सादर केल्या. बडाख्याल, संगीतकार पं. अनंत जोशी यांची अलबेलो मेरे राजकुमार अशी बंदिश सादर कली. मिश्र खमाज आणि दादरा रागाने त्यांनी दुसऱ्या पुष्पाची सांगता केली. त्यांना तबल्यावर आदित्य पानवलकर यांनी तर हार्मोनियमवर अमेय गांधी यांनी साथ संगत केली.
प्रसिध्द संगीतकार हार्मोनियमवादक अनंत जोशी यांनी ‘पं. राम मराठे महोत्सव'च्या सकाळच्या सत्रातील तिसरे पुष्प गुंफले. हार्मोनियमवरच्या स्पर्शाने त्यांनी प्रत्येक ताल, राग, आणि भावना रसिकांपर्यत पोहोचवत त्यांची दाद मिळवली. त्यांना तबल्यावर अभय दातार यांच्यासह समीर गानू अभ्यंकर यांनी साथसंगत केली.
सायंकाळच्या सत्रातील पाचवे पुष्प पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी गुंफले. तबला, पाश्चात्य ड्रम, कथक नृत्य, हिंदुस्तानी गायन, संगीत, सतार आणि बासरी यांना एकत्रित करणारा सदर अभिनव दृष्याविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला. वादन, गायन आणि नर्तन या तिघांच्या समन्वयातून संगीत रसिकांसमोर पोहचते आणि हेच ताल यात्राचे वैशिष्ट्य असल्याचे तळवलकर यांनी यावेळी नमूद केले. सहावे पुष्प तानसेन पुरस्कार प्राप्त पं. राजा काळे यांनी गुंफले, त्यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करीत महोत्सवाची सांगता झाली. त्यांना हार्मोनियमवर सिध्देश बिचोलकर, पं शरद मटकर, पं. तुळशीदास बोरकर यांनी तर तबल्यावर मंदार पुराणिक यांनी साथसंगत केली.
तिसऱ्या दिवशीच्या दुपारच्या सत्रात परस्पर सहायक मंडळ (वाघांबे) मुंबई निर्मित जय जय गौरीशंकर या संगीत नाटकाला ठाणेकर रसिकांनी रंगायतन तुडुंब भरले होते. यावेळी युवा कलाकारांनी एकाहून एक सरस गाणी अप्रतिम सादर केली. व्ौÀलास पर्वतचा देखावा, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा तसेच सर्वांची उत्तम देहबोली आणि स्पष्ट उच्चारांसह संवाद त्यामुळे नाटक रसिकांच्या पसंतीस उतरले.
संपूर्ण ‘महोत्सव'चे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले. सदर महोत्सव यशस्वी करण्यासाठी माहिती-जनसंपर्क विभागातील मनाली माईणकर, संदीप जिनवाल, विकास मोरे, सुजाता सोनावणे, मंदार गायकवाड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.