धोकादायक इमारतीचे बांधकाम तोडताना इमारतीचा भाग कोसळला
उल्हासनगर : जीवघेण्या निष्काळजीपणाचा आणखी एक प्रकार उल्हासनगरात समोर आला आहे. कॅम्प क्र.५, सेक्शन ३९ येथील साईबाबा मंदिरासमोर ‘हरिओम पॅलेस' नावाची ५ मजली धोकादायक इमारत पाडण्याचे काम सुरु असताना मोठा अपघात झाला. अचानक जोरदार आवाजासह इमारतीचा मोठा भाग कोसळून थेट हायव्होल्टेज वीजवाहिन्यांवर पडला. यामुळे तारा खांबासकट तुटून खाली कोसळल्या. भीषण आवाज आणि ठिणग्यांच्या स्फोटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. क्षणभरातच नागरिक घाबरुन बाहेर धावले. परंतु, सुदैवाने त्यावेळी कोणीही जवळ नसल्याने मोठा अनर्थ टळला.
उल्हासनगर महापालिकेकडून कॅम्प नं.५ येथील साईबाबा मंदिरासमोरील २ धोकादायक इमारती पाडण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यातील एक इमारत आधीच जमीनदोस्त करण्यात आली होती, तर दुसरी ‘हरिओम पॅलेस' पाडण्याचे काम सुरु होते. कामादरम्यान अचानक इमारतीचा एक भाग जोरात कोसळला आणि थेट वीजवाहिन्यांवर आदळला. क्षणार्धात वीजतारा तुटून रस्त्यावर आल्या आणि ठिणग्या उडताच लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी परिसरात नागरिक किंवा कामगार उपस्थित नसल्याने गंभीर हानी टळली.
सदर घटनेची माहिती मिळताच ‘महावितरण'चे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील वीजपुरवठा तातडीने बंद करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. एका कर्मचाऱ्याने सांगितले, जर महापालिकेकडून या पाडकामाची पूर्वसूचना मिळाली असती, तर आम्ही आधीच वीजपुरवठा खंडीत करुन आवश्यक सुरक्षा उपाय करु शकलो असतो. पण, आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या निष्काळजीपणामुळे परिसरातील दुकानदार आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रभाग समिती क्र.४ च्या सहाय्यक आयुक्त अलका पवार यांनी सांगितले, घटनास्थळी कर्मचाऱ्यांना पाठवून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने वीज विभागाला पाडकामाबाबत लेखी सूचना पूर्वीच दिली होती. तथापि, स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पाडकामाच्या वेळी कोणतेही सुरक्षा कुंपण, पोलीस बंदोबस्त किंवा अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित नव्हते.