प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
लॉजिस्टिक क्षेत्रातील क्रांतीचा नवा अध्याय
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ विमान उतरण्याचे ठिकाण नसून, ते भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचे पॉवर हाऊस ठरेल. ‘फेडएक्स' सारख्या जागतिक महासत्तेने मुंबईत आपले हब निर्माण करण्याचा घेतलेला निर्णय महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांवर आणि व्यापार क्षमतेवर जगाने टाकलेला विश्वास आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उलवे येथे काढले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील अग्रगण्य लॉजिस्टिक कंपनी ‘फेडएक्स'च्या देशातील पहिल्या पूर्णपणे स्वयंचलित ‘एअर कार्गो हब'च्या भूमीपुजन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ‘फेडएक्स'चे अध्यक्ष तथा सीईओ राज सुब्रमण्यम, वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, ‘अदानी समूह'चे संचालक जीत अदानी, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि ‘फेडएक्स'चे जागतिक पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसीची अंमलबजावणी करताना लॉजिस्टिक खर्च कमी करणे असे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. फेडएक्स जेव्हा एआय आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन येथे काम करेल, तेव्हा व्यापारातील अडथळे दूर होऊन मालवाहतूक अधिक स्वस्त आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन भारताच्या भविष्यातील विकासाचे केंद्र असल्याचे नमूद करत ना. फडणवीस म्हणाले की, २०२७ पर्यंत भारताला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा आणि विशेषतः नवी मुंबई विमानतळाचा वाटा मोलाचा असेल. महाराष्ट्राचा देशाच्या एकूण उत्पादनात २० टक्के वाटा आहे, जो या नवीन सुविधेमुळे अधिक विस्तारला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ एक विमानतळ नसून, ते पश्चिम भारताचे आर्थिक प्रवेशद्वार आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील उत्प्रेरक ठरेल. जेएनपीटी बंदरापासून अवघ्या १४ कि.मी. अंतरावर असलेले नवी मुंबई विमानतळ, वर्षाला ३ दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळण्याची क्षमता ठेवणारे जगातील दुर्मिळ केंद्र बनेल, असा विश्वास एएएचएल संचालक जीत अदानी यांनी यावेळी व्यक्त केला.
तर ‘फेडएक्स'चे अध्यक्ष तथा सीईओ राज सुब्रमण्यम यांनी मुंबईशी आपले जुने नाते असून आज येथे २५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करताना आपल्याला अभिमान वाटत असल्याचे सांगितले. तसेच ३ लाख स्क्वेअर फुटाचे पूर्णपणे स्वयंचलित मेगा हब भारतीय निर्यातदारांना, विशेषत लघु उद्योगांना जागतिक बाजारपेठेतील २२० देशांशी अत्यंत कार्यक्षमतेने जोडण्याचे काम करेल, असे सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.