प्रतिक्षा संपली! गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुल वाहतुकीसाठी खुला
अंबरनाथ नगरपालिकेत सत्तासंघर्ष टोकाला
अंबरनाथः राज्यात महायुती म्हणून एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील स्थानिक संघर्ष ‘अंबरनाथ नगरपरिषद'च्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत उघडपणे चव्हाट्यावर आला आहे. तब्बल ८ तास चाललेल्या या वादळी सभेत ‘शिवसेना'ने आपल्या संख्याबळाचा वापर करत ‘भाजपा'च्या २८ नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचे विषय फेटाळून लावले, तर स्वतःच्या ३२ नगरसेवकांच्या कामांना बहुमताने मंजुरी मिळवून दिली. नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी दावा केला की, पावसाळापूर्व कामांसाठी सर्व ५९ नगरसेवकांना प्रत्येकी २५ लाखांचा निधी समान पध्दतीने वाटप करुन विकासाचा नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शिवसेना नगरसेवकांनी सदर समान विकास धोरण धुडकावून लावत केवळ आपल्याच प्रभागातील विषयांना मंजुरी देण्याची आक्रमक भूमिका घेतली.
सभेच्या सुरुवातीलाच शिवसेना नगरसेवक अब्दुल शेख यांनी मांडलेल्या आणि संदीप तेलंगे यांनी अनुमोदन दिलेल्या सूचनेमुळे ‘भाजपा'च्या प्रभागातील पायवाटा, गटारे आणि नालेसफाई यासारखी महत्त्वाची कामे रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी सांगितले की, सर्व नगरसेवकांशी चर्चा करुनच अजेंडा ठरवला असतानाही विकासकामांना विरोध होणे, हीच मोठी शोकांतिका आहे. दुसरीकडे भाजप नगरसेवक अभिजीत करंजुले यांनी ‘शिवसेना'ला थेट आव्हान दिले की, लोकसभेत आणि राज्यात ‘भाजपा'ची साथ हवी असते. मग, आगामी विधान परिषद निवडणुकीत ‘शिवसेना'ला ‘भाजपा'चे मतदान नको आहे का? ते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट करावे. ‘शिवसेना'ने विकासाला केलेला विरोध म्हणजे जनतेच्या हिताशी केलेले ‘पाप' असून ते आम्ही नागरिकांपर्यंत नेऊ, असा इशाराही ‘भाजपा'च्या वतीने देण्यात आला.
या राजकीय संघर्षाला उत्तर देताना शिवसेना नगरसेवक अब्दुल शेख यांनी ‘भाजपा'वर स्वार्थी राजकारणाचा आरोप केला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.)'च्या सदा पाटील आणि त्यांच्या नगरसेवकांना आपल्या बाजुने वळवून ‘भाजपा'ने उपनगराध्यक्ष पद स्वार्थासाठी सदा पाटील यांना दिले. तसेच तांत्रिक कारणांमुळे ‘भाजपा'चे जास्त स्वीकृत नगरसेवक निवडून आले, असा दावा त्यांनी केला. आगामी विषय समिती निवडणुका आणि ‘काँग्रेस'च्या १२ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाचे न्यायालयीन प्रकरण पाहता, भाजप केवळ स्वतःच्या फायद्यासाठी विषयांना मंजुरी देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळेच आम्ही त्यांच्या कामांना विरोध केल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कैलास कॉलनी आणि चिंचपाडा तलावाच्या ६० लाखांच्या सफाई कामावरुनही सभागृहात मोठा गदारोळ झाला. मात्र, अखेर प्रशासकीय गरज लक्षात घेता या विषयाला मंजुरी देण्यात आली. एकंदरीतच अंबरनाथमधील या सत्तासंघर्षामुळे शहराच्या विकासकामांवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.