‘शिवसेना-मनसे'ची ठाणे महापालिकावर धडक
नेत्यांची आयुवत सौरभ राव यांच्याशी चर्चा
ठाणे : ठाणे महापालिका मध्ये झालेल्या गैरकारभाराची जबाबदारी घ्यावी यासह ठाणे मधील विविध समस्या निवारण्यासाठी ठाणे शहरातील नागरिकांच्या वतीने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने १३ ऑवटोबर रोजी संयुक्त निषेध मोर्चा काढण्यात आला. गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालयापर्यंत सदर मोर्चा काढण्यात आला. ‘शिवसेना'चे नेते आ. भास्कर जाधव, शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड, ‘मनसेे'चे नेते अविनाश जाधव, अभिजीत पानसे, ‘काँग्रेस'चे विक्रांत चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, कल्याणचे नेते सुरेश (बंड्या) साळवे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोर्चा गडकरी रंगायतन येथून सुरुवात झाली. यानंतर मोर्चा साईकृपा हॉटेल, न्यू इंग्लिश स्वुÀल, माधवी निवासस्थान, घंटाळी नाका, साईबाबा मंदिर, तीन पेट्रोल पंप, आराधना टॉकीज, रायगड गल्ली, चंदनवाडी शाखा ओलांडून ठाणे महापालिका मुख्यालय पर्यंत काढण्यात आला. यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
बैठकीत आंदोलकांनी भ्रष्टाचार आणि गैरवर्तनाचा आरोप करत सहाय्यक आयुक्त बोरसे यांना हटवण्याची मागणी केली. त्यांनी दावा केला की त्यांची अंतर्गत ‘सेटींग्ज' आहेत आणि आयुक्तांकडून आश्वासन मागितले. तसेच जर कारवाई झाली नाही तर धरणे आंदोलन करु, असा इशाराही यावेळी नेतेमंडळींनी आयुवतांना दिला. त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये नागरिकावर शारीरिक हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता; परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. बोरसे यांनी जर कोणत्याही व्हिसलब्लोअर्स किंवा नागरिकाचे नाव घेतले तर ते त्यांना सोडणार नाही, असा इशाराही ‘महाविकास आघाडी'च्या नेत्यांनी दिला.
दरम्यान, आयुक्त सौरभ राव यांनी योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच समस्या सोडवण्यासाठी डिसेंबर पर्यंतची मुदत मागितली.