महापालिका निवडणूक निकालाच्या पार्श्भूमीवर नवी मुंबई पोलीस सतर्क
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच काही पक्षांच्या पदाधिकाऱयांना प्रतिबंधात्मक आदेशाच्या नोटीस देखील बजावल्या आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई व पनवेल महानगरपालिका अंतर्गत येणाऱया सर्व मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुरुवार दि.15 जानेवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणूकांमध्ये हाणामारी व पैसे वाटपाच्या काही घटना वगळता, दोन्ही महापालिकेच्या निवडणूका शांततेत पार पडल्या आहेत. महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नवी मुंबई पोलिसांनी आपल्या हद्दीत चोख बंदोबस्त ठेवल्याने दोन्ही महापालिकेच्या हद्दीत मतदान शांततेत पार पडले. शुक्रवारी या दोन्ही महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.
या निकालानंतर पराभूत झालेल्या व विजयी उमेदवाराच्या पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये वाद विवाद व भांडणे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावर व चौकात पेट्रोलिंग, तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत देखील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलिसांनी पूर्वखबरदारी म्हणून काही पक्षांच्या पदाधिकाऱयांना प्रतिबंधात्मक नोटीसा देखील बजावल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही, असे कृत्य करु नये, अशी समज पोलिसांकडून या नोटीसद्वारे दिली गेली आहे.
सर्व मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीची मतमोजणी 8 ठिकाणी होणार आहे. तसेच पनवेल महापालिकेच्या निवडणूकीची मतमोजणी 6 ठिकाणी होणार आहे. या सर्व मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. या मतमोजणी केंद्रावर सर्व पक्षिय लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते निकाल पाहण्यासाठी येणार असल्याने सदर परिसरात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व मतमोजणी केंद्रावर तसेच आजुबाजुच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच या सर्व मतमोजणी केंद्रालगतच्या मार्गावर निवडणुक कामकाजासाठी अधिग्रहीत केलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पार्कींग व प्रवेश करण्यास पुर्णपणे मनाई करण्यात आली आहे. मात्र या अधिसुचनेतून पोलीस वाहने, अग्निशमन दल, शासकीय वाहने, ऍम्बुलन्स तसेच निवडणुकीच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.