पुनाडे धरणाची पाणी पातळी खालावली
उरण : उरण पूर्व विभागातील १० गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणाची पाणी पातळी वाढत्या उष्णतेमुळे आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लिकेजमुळे खालावली आहे. त्यामुळे रहिवाशांना अशुध्द पाणी पुरवठा होत असल्याने आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे .त्यामुळे सदर परिसरातील रहिवाशांना शुध्द पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
उरणच्या पूर्व विभागातील पुनाडे, वशेणी, कडापे, सारडे, पिरकोण, पाणदिवे, पाले, गोवठणे, आवरे, भंगारपाडा या १० गावांना पुनाडे धरणामार्फत पाणी पुरवठा केला जातो. पुनाडे धरण ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'च्या अंतर्गत येत असून नव्याने बांधण्यात आलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून सदर १० गावांतील रहिवाशांना ‘८ गांव पाणी पुरवठा कमिटी'च्या देखरेखीखाली पाणी पुरवठा केला जातो. मात्र, धरण परिसरात मुबलक पाऊस झाला तरी पाणी पातळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील लिकेजमुळे आणि वाढत्या उष्णतेमुळे लवकर घसरते. परिणामी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाणी तळ गाठतो. त्यामुळे या गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
२ वर्षांपूर्वी पुनाडे धरणातील गाळ काढण्याचे कामही करण्यात आले होते. तरी देखील या परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यात सध्या धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठल्याने अशुध्द पाणी पुरवठा होतो. मात्र, या गढूळ पाण्यामुळे गावातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची संभवना नाकारता येत नाही. सध्या अनेक रहिवासी स्वखर्चाने कोप्रोली अथवा चिरनेर येथून हेटवणे पाईपलाईन वरुन शुध्द पाणी घेऊन येत आहेत. एकंदरीतच परिसरातील रहिवाशांना भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी शासनाने पुनाडे धरणचा लिकेज काढण्याचे कामही हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.
आज आमच्या गोवठणे गावात आम्हाला ५ दिवसांनी पाणी पुरवठा होतो. सदर पाणी पुरवठा पुरेसा नसून ज्याप्रमाणे शुध्द पाणी पुरवठा पाहिजे, त्याप्रमाणे ते मिळत नाही. त्यामुळे अद्यावत शुध्दीकरण प्रकल्प बसविण्यात आले पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
-समाधान म्हात्रे, ग्रामस्थ-गोवठणे.
पुनाडे धरणात पाणी मुबलक आहे. त्याच्या नियोजनाचे काम ‘१० गाव कमिटी'कडे आहे. आताच पाणी शुध्दीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. ज्या कडापे गावात पाणी जात नाही, त्या ठिकाणी ‘जल जीवन मिशन'मधून पाईप लाईन टाकण्याचे काम झाले आहे. लवकरच त्यांनाही पाणी मिळेल.
-नामदेवराव जगताप, उपअभियंता-एमजीपीएल.