नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज

नवी मुंबई : येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीची सज्जता महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबध्द रितीने करण्यात आली आहे. नमुंमपा क्षेत्रातील २८ प्रभागांमध्ये सदर निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पध्दतीने होत असून १ ते २७ प्रभागांमध्ये अ,ब,क,ड अशा ४ जागांकरिता आणि २८ व्या प्रभागामध्ये अ,ब,क अशा ३ जागांकरिता नागरिकांना मतदान करावयाचे आहे.

निवडणूकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्तांमार्फत नियमितपणे आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आलेली आहे. ‘निवडणूक आयोग'मार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक ‘महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाऊसाहेब दांगडे तसेच निवडणूक निरीक्षक ‘एमआयडीसीे'चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर यांच्यामार्फतही निवडणूकविषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ९,४८,४६० इतकी मतदार संख्या असून त्यामध्ये ५,१६,२६७ पुरुष आणि ४,३२,०४० महिला आणि १५३ इतर मतदार आहेत.

निवडणूकीसाठी ८ विभागांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापित असून त्या ठिकाणाहून निवडणूक साहित्य वितरण व संकलन केले जाणार आहे. निवडणुकीकरिता १८५ ठिकाणांवर ११४८ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत.

मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात येत असून सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी दिव्यांग आणि वृध्द नागरिक यांच्याकरिता व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रावरील कामकाजाकरिता मतदान केंद्राध्यक्ष, ३ मतदान केंद्र अधिकारी आणि शिपाई अशा एकूण ६,८९० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांची दोन प्रशिक्षणे पूर्ण झालेली आहेत. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीसही सज्ज असणार आहे.

निवडणुकीकरिता १४०० हून अधिक कंट्रोल युनिट आणि ३७०० हून अधिक बॅलेट युनिट प्राप्त झालेली असून सर्व मतदान यंत्रांची प्रथम स्तर तपासणी करण्यात आलेली आहे. सर्व मतदान यंत्रे सिलबंद करुन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निर्माण केलेल्या स्ट्राँग रुममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेली आहेत.

सर्व मतदान केंद्रांवर आणि शहरात ठिकठिकाणी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सज्ज आहेत.

दरम्यान, आज १३ जानेवारी रोजी, सायंकाळी ५.३० वाजता प्रचार कालावधी संपुष्टात येणार असल्याने त्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॅनिक आणि प्रत्यक्ष अथवा सोशल मिडीयाद्वारे कोणत्याही व्यक्तीस, उमेदवारास, राजकीय पक्षास प्रचार करता येणार नाही, याची नोंद घ्यावयाची असून आचारसंहिता पथकाने याबाबत अधिक दक्ष रहावे, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिल्या आहेत व नागरिकांनाही याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सत्ताधाऱ्यांंमध्ये नवी मुंबईत भ्रष्टाचाराची स्पर्धा -‘ठाकरे युती'चा आरोप