व्यावसायिक वापरास मैदान दिल्यास आयुक्तांच्या दालनात मुलांना खेळवू

कल्याण : व्यावसायिक मेळ्यासाठी कल्याण पश्चिमेतील यशवंतराव क्रीडा संकुल मैदान महिनाभर ‘केडीएमसी'कडून भाड्याने देण्यात आले होते. मात्र, मेळा आयोजकांनी मैदानाची दुरवस्था केली असून मैदानात कचरा, बांबू, दारुच्या बाटल्यांचा ढीग पडला आहे. यामुळे या मैदानात खेळण्यासाठी येणाऱ्या खेळाडुंना याचा त्रास होत असून मैदान पुन्हा व्यावसायिक वापरास दिल्यास खेळाडू मुलांना आयुक्तांच्या दालनात खेळवणार, असा इशारा ‘शिवसेना'चे माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्राद्वारे दिला आहे.

कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र.१० रामबाग सिंडीकेट भागातील यशवंतराव क्रीडा संकुल मैदान मुलांना खेळण्यासाठी, नागरिकांना चालण्यासाठी आणि योगा करण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र, या मैदानात व्यावसायिक पाळणे, झोपाळे, व्हीडीओ गेम यासारखे खेळ लावण्यात येत असतात. याबाबत माजी नगरसेवक गणेश जाधव यांनी उद्यान विभागाच्या उपायुक्तांना तक्रार दिली होती. या मैदानात दररोज फुटबॉल खेळणे, क्रिकेट खेळणे, योगा करणे, महिलांच्या कवायती यासारखे खेळ आणि योगा घेण्यात येत असतो. पण, गेल्या २ ते ३ वर्षापासून येथे व्यावसायिक पाळणे लावणे, व्हिडीओ गेम खेळणे, आदि प्रकार होत असतात.

सदर मैदान सर्व इमारतींच्या मध्यभागी असून बाजुला नुतन विद्यालय आणि ल्यूईस विद्यालय आहे. काही खेळांमुळे कर्कश आवाज होत असतो, मोठ्या प्रमाणात डीजे लावले जाते. व्हिडीओ गेमसह नागरिकांचा मोठ्या प्रमाणात आवाज होत असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो. ज्येष्ठ नागरिकांना फिरता येत नाही, मुलांना खेळता येत नाही. या व्यावसायिक मेळ्यामुळे या संपूर्ण भागात ट्रॅफिकची समस्या उद्‌भवत असते. व्यावसायिक मेळ्यात घाणेरड्या प्रकारे नागरिकांना जेवण, नाश्ता, मांसाहार पदार्थ, आदि सर्व उघड्यावर ठेऊन विकले जाते. यापासून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याकडे महापालिकेचे कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही. यामुळे नागरिक आजारी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सध्या विद्यार्थ्यांचे हिवाळी स्पोर्टस्‌ सुरु असून नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंत होत असतात. सध्या ग्राऊंडवर चालण्यासाठी, योगासाठी, खेळणारी मुले पूर्णपणे वंचित राहत असून यापुढे जर मुलांना खेळण्यासाठी, नागरिकांना वापरासाठी ग्राऊंड मिळत नसेल तर महापालिका आयुक्तांच्या दालनात सर्व खेळाडुंना बसवून आंदोलन करण्याचा इशारा गणेश जाधव यांनी दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'च्या सेंट्रल पार्क उद्यानाची दुरवस्था